नगर : दिल्लीत शेतक ऱ्यांच्या मोर्चावर केलेला लाठीमार भाजप सरकारला महागात पडेल, आमच्या विरोधात बोलाल तर आम्ही तुम्हाला अटक करु किंवा लाठीमार करु, ही भाजपची दडपशाही आहे, भाजप सरकार शेतक ऱ्यांविरुद्धही दबावतंत्राचा वापर करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

श्रीमती सुळे सध्या नगरच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या विविध ठिकाणी सभा होत आहेत. आज, बुधवारी त्यांनी नगरमध्ये पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली तसेच शहरातील राधाबाई काळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, अंबादास गारुडकर आदी उपस्थित होते.

दिल्लीत मोर्चा नेणारे शेतकरी आक्रमक नव्हते, ते दिल्लीत येणार हे सरकारला माहिती होते, तरीही त्यांना विरोध केला जात होता, त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतक ऱ्यांवर सरकारने त्यांचा आवाज दडपण्यासाठीच लाठीमार केला, असा आरोप खा. सुळे यांनी केला.

राफेल विमान खरेदीच्या व्यवहारात अनेक मुद्दे संशयास्पद आहेत, सरकार स्वत:चा पारदर्शी असा प्रचार करते आहे तर संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीला का तयार होत नाही, त्यातुन खरे, खोटे काय ते बाहेर येईल, लपवण्यासारखे काहीच नसेल तर सरकार का घाबरते आहे, असा प्रश्न त्यांनी केला. सरकारने केवळ त्यांच्या विचाराचे असलेल्यांचेच गुन्हे मागे घेतले आहेत, त्यात संभाजी भिडेही त्यांच्याच विचाराचे आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. कर कमी करुन राज्य सरकार इंधनाचे दर कमी करु शकते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अर्थमंत्री होते,त्यावेळी त्यांनी सरकार कशा पद्धतीने इंधनाचे दर कमी करु शकते, हे सरकारला दाखवले आहे, परंतु सरकारला गरिबांचा गळा दाबायचा असल्यानेच ते दर कमी करत नाहीत, असा आरोपही सुळे यांनी केला.

खड्डय़ांसाठी माहिती अधिकाराचा वापर

रस्त्यातील खड्डय़ांमुळे सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो, अनेकांचे मृत्यू त्यामुळे घडलेले आहेत, जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो, याकडे लक्ष वेधताना खा. सुप्रिया सुळे यांनी सरकार या प्रश्नावर असंवेदनशील असल्याचा आरोप केला व मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात जातीने लक्ष घालावे, असे पत्र पाठवल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता असताना, आमच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा, असे म्हणत होते, आता कोणावर गुन्हा दाखल करायचा, या मृत्यूला जबाबदार कोण याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असा प्रश्न त्यांनी केला. गेल्या वर्षभरात खड्डय़ांवर राज्यात किती खर्च केला, याची माहिती आपण माहिती अधिकाराचा वापर करुन मागवली असल्याचे त्यांनी सांगितले.

मनसेच्या प्रस्तावाची माहिती नाही

भाजपविरोधी आघाडीत प्रकाश आंबेडकर व एमआयएम सहभागी नाहीत, याकडे लक्ष वेधले असता खा. सुळे म्हणाल्या, प्रत्येकाला आपल्या पक्षाचा, आघाडीचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, याचा अर्थ त्यांच्या सभेला गर्दी होते, ती मतात परिवर्तित होईल, असे नाही. आम्ही विरोधी आघाडीबाबत अतिआत्मविश्वास बाळगत नाही. विरोधी आघाडीत मनसेच्या प्रवेशाबाबत सुळे यांनी उत्तर देणे टाळले, तो पक्षाचा अधिकार आहे, तसा प्रस्ताव आहे की नाही, हेही मला माहिती नाही, तशी चर्चाही नसल्याचे त्या म्हणाल्या.