बॉलिवूड अभिनेता सुशात सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केल्याची घटना घडली होती. त्यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपा नेते राम कदम यांनीदेखील या प्रकरणी संबंधित तपास यंत्रणेवर टीका केली होती. त्याचसोबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनीही आक्रमक पवित्रा घेत ट्विट केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे.

अमृता फडणवीस यांनी एका तराजूचा फोटो पोस्ट केला आहे. न्यायदेवतेच्या हाती असलेला हा तराजू आहे, कारण त्यांनी या फोटोसोबत न्यायव्यवस्थेशी निगडीत असे एक ट्विट केले आहे. “जर तुम्ही कोणासोबत वाईट वागला असाल, तर तुमचाही नंबर नक्की लागणार. त्यासाठी वाट पाहा. कारण देवाच्या दरबारात न्यायव्यवस्थेच्या चक्की दळायला थोडा वेळ जरूर लागतो, पण पीठ मात्र अगदी बारीक दळलं जातं (म्हणजेच न्याय मिळण्यास उशीर लागत असला, तरी जेव्हा शिक्षा मिळते ती अतिशय कठोर असते)”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं. याचसोबत त्यांनी कर्म आणि जय हिंद असे दोन हॅशटॅगही वापरले.

याआधीच्या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी मुंबईतील असुरक्षित वातावरणाबद्दल मत व्यक्त केलं होतं. “सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं होतं. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले होते.