राज्यात सुमारे २ लाख ३० हजार सहकारी संस्थांपैकी लाखभर संस्था या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे मतदार होण्यासाठी केवळ कागदावरच असून, पिशवीतल्या या सर्व बोगस सहकारी संस्था बंद करण्याचे लक्ष्य आहे. सहकारात चुकीचे काम करणाऱ्यांची गय केली जाणार नसून, सहकाराच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबध्द असल्याची ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पतसंस्थेतील ५० हजारापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देता यावे यासाठी स्थिर निधी ठेवण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले.
यशवंत को-ऑप. बँक व यशवंत उद्योग समूहातर्फे आयोजिलेल्या सहकार मेळावा व सन्मान सोहळा अशा समारंभात ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष सुभाष एरम यांच्या हस्ते व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या उपस्थितीत मानपत्रासह यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुभाष एरम होते. सहकार भारतीचे सरचिटणीस प्रा. डॉ. उदय जोशी, कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक काकासाहेब कोयटे यांचाही सत्कार पार पडला. भाजपचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हाध्यक्ष अॅड. भरत पाटील उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, की राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून शेखर चरेगावकर यांची निवड झाल्याने सहकार क्षेत्राला एक अभ्यासू नेतृत्व लाभले असून, चरेगावकरांच्या निवडीमुळे सहकाराला दिशा व गती मिळताना, माझ्यावरील कामाचा ताणही कमी झाला आहे. सहकार क्षेत्राच्या भल्यासाठीच राज्य सरकार सहकार कायद्यातील दुरुस्ती विधेयक आणणार आहे, सहकारातील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मंत्र्यांच्या सहीसाठी अनेक वष्रे फाईल्स रखडल्या होत्या. सत्तेवर येताच आम्ही त्या फाईल्स् पूर्ण केल्या. कोणाला पाठीशी न घालता आम्ही सरकारातील अपप्रवृत्तींवर आणि चुकीच्या कारभारामुळे डबघाईला आलेल्या संस्थांवर कारवाई सुरू केली आहे. सहकार क्षेत्राला सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. दुष्काळी भगातील कराड अर्बनसारख्या अनेक बँकांची, सहकारी संस्थांची त्यांच्या शहरातील आर्थिक उलाढाल ही एखाद्या महापालिकेच्या बजेटपेक्षा अधिक आहे. या सहकारातील मोठय़ा संस्थांनी उद्योजक तयार करून उद्योगधंदे निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. तसेच पतसंस्था, बँकांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जेथे आवश्यकता असेल तेथे राज्य सरकारला मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रा. डॉ. उदय जोशी, काकासाहेब कोयटे, सुभाषराव जोशी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक शेखर चरेगावकर यांनी केले. यावेळी यशवंत बँक व यशवंत महिला प्रतिष्ठान यांच्यामार्फत बचत गटातील दहा हजार महिलांना पंतप्रधान जन-धन-योजनेतून देण्यात आलेल्या विमा पॉलिसींचे प्रातिनिधिक वितरण, शेतकऱ्यांचा व कृषी कर्ज लाभधारक शेतकऱ्यांचा सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.