राज्यपाल भगतिसंह कोश्यारी व महाविकासघाडी सरकारमधील वादाच्या नव्या अध्यायाला कालपासून सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. कारण, काल कॅबिनेटची महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर, राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारपरिषदेत घेत राज्यपालांवर जोरदार टीका केली. शिवाय, राज्यपालांच्या कार्यशैलीवर मंत्रिमंडळाकडूनही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. महाविकास आघाडीमधील नेते आता राज्यपालांवर निशाणा साधताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

राज्यपालांच्या दौऱ्यांवर मंत्रिमंडळाचा आक्षेप

“ज्याप्रकारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी इथे काम करत आहेत, त्यावरून असं दिसून येत आहे की ते घटनात्मक पदासाठी नाही, तर भाजपा नेते म्हणून आरएसएस साठी काम करत आहेत. त्यांचे वर्तन दुर्दैवी आहे. हे भारतीय लोकशाहीच्या विरोधातील षडयंत्र असल्याचे दिसत आहे.” अशा शब्दांमध्ये नितीन राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

तसेच, “ते राज्य सरकारला दुखावण्याचा प्रयत्न करत आहेत. ते काहीही करत नाही. पण जेव्हा कुणी त्यांच्या भेटीसाठी येतं तेव्हा ते आरएसएस आणि भाजपची स्तुती करतात. याला कोणही पाठिंबा देणार नाही.” असंही नितीन राऊत यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

“महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर…,” संजय राऊतांनी राज्यपालांना दिला इशारा

तर,राज्यपालांनी सरकारची अडवणूक करु नये. हा राजकीय दबावाचाच एक प्रकार असतो. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं, पाय खेचण्यासाठी नसतं. पाय खेचण्याचा प्रयत्न केला तर तुमचाच पाय गुंत्यात अडकून पडाल अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केलाआहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांकडून महाविकासआघाडीच्या अधिकारात वारंवार हस्तक्षेप – नवाब मलिक

”महाराष्ट्रात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर, महाराष्ट्राचे राज्यपाल हे वारंवार सरकारच्या अधिकारात हस्तक्षेप करत असल्याचं दिसून येत आहे.” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी काल राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना केलं होतं. तसेच, सरकारने केलेल्या कामांचं परस्पर उद्घाटन केलं जात असल्याचंही यावेळी मलिक यांनी बोलून दाखवलं.

“तुम्ही मुख्यमंत्री नाही,” नवाब मलिकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना सुनावलं

दरम्यान, विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुक्त्यांसह विविध मुद्यांवर राजभवन विरुद्ध महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचा आता नवा अध्याय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या दौऱ्यावरून सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यपालांच्या नियोजित परभणी, हिंगोली व नांदेड दौऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या आढावा बैठका व वसतिगृहांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे तीव्र पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज्यपाल कोश्यारी हे राज्य सरकारच्या कामात हस्तक्षेप करत असून दोन सत्ताकेंद्र तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दांत मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत तीव्र नापसंती व्यक्त करण्यात आली होती.