यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यंदाचे हे अधिवेशन केवळ औपचारिकता असल्याचे म्हटले आहे. शिवाय, मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटप झालेले नसल्याने नेमक कोण उत्तरदायी आहे, हेच कुणाला माहिती नसल्याचा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

यंदाचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन केवळ सहा दिवसांसाठी बोलावण्यात आले आहे. सरकार स्थापनेपासून आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही किंवा खाते वाटपही करण्यात आलेले नाही. हे अधिवेश केवळ औपचारिकता म्हणून घेतले जात आहे, कारण कोण उत्तरदायी आहे, हे कोणालाच माहिती नाही, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामकाज सल्लागार समितीमध्ये विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातील कामकाजावर आज चर्चा झाली.

अधिवेशनात पुरवणी मागण्या, अशासकीय कामकाज, शासकीय विधेयके, राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा आदी कामकाज होणार आहे. विधान परिषदेत सात अशासकीय विधेयकांवर चर्चा होणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्रातील शरद बोबडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.