चंद्रपूर : अंबुजा सिमेंट लेबर कॉलनीमागील मंगी गावालगतच्या नाल्यात आंघोळ करण्यासाठी गेलेली तीन मुलांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी ९.३० वाजता उघडकीस आली. सार्थक शशिकांत अल्हाट (१२) रा. उप्परवाही, मंजित विजय सिंग (१४) उप्परवाही, शुभम दिवाकर गाजेरे (१४) रा. रामटेक अशी मृत मुलांची नावे आहेत. सुटीमुळे सकाळी चौघेजण फिरण्यासाठी नाल्याजवळ गेले होते. सार्थक, मंजित व शुभम यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी अनुनय हा आंघोळीसाठी पाण्यात उतरला नाही. बराच वेळ होऊनही सार्थक, मंजित व शुभम हे तिघेही पाण्याबाहेर न आल्याने अनुनयने अंबुजा सिमेंट कॉलनीकडे धाव घेतली व ती माहिती कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अंबुजा सिमेंटचे सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून सार्थक शशिकांत अल्हाट, मंजित विजय सिंग, शुभम दिवाकर गाजेरे यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. तिघांनाही गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 3, 2019 3:28 am