केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापुरमधील तिघांनी यश मिळवले आहे. यामध्ये दोन तरुणी व एक तरुणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे सौरभ व्हटकर यांनी घरीच अभ्यास करून हे यश मिळवलं आहे.

ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या डॉ. प्रणोती संजय संकपाळ यांनी दुसऱ्या प्रयत्नात व कोल्हापुरमधील गौरी नितीन पुजारी यांनी तिसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. दोघींना पुण्यातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर्गाचा लाभ झाला. तर कोणत्याही मार्गदर्शक वर्गाला उपस्थित न राहता घरीच अभ्यास करून सौरभ विजयकुमार व्हटकर यांनी यश मिळवले आहे. कोल्हापूरच्या इतिहासात एकाच वेळी तिघांनी ही आव्हानात्मक परीक्षा उत्तीर्ण होण्याची पहिलीच वेळ आहे.

करवीर तालुक्यातील नेर्ली गावच्या डॉ. प्रणोती यांनी सांगलीतील भारती विद्यापीठातून दंत वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१७ मध्ये त्यांचा पहिला प्रयत्न असफल ठरल्यानंतर २०१९ मध्ये दुसऱ्यांदा परीक्षेला बसत त्या ५०१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

राजारामपुरी येथील गौरी पुजारी यांनी तिसऱ्या प्रयत्नांमध्ये २७५ वा क्रमांक मिळवत हे यश मिळवले. बी. ई. मेकॅनिकल या अभियांत्रिकी शाखेत ८५ टक्के गुण मिळवून पदवीधर झालेल्या गौरी यांनी यापूर्वी दोनदा परीक्षा दिली होती. कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे उपाध्यक्ष दिनकर किल्लेदार यांच्या गौरी दिग्विजय किल्लेदार या स्नुषा आहेत. या दोघींनीही पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा वर्गाचे मार्गदर्शन घेतले होते. तर मुलाखतीची तयारी दिल्लीमध्ये केली होती.

तर, कोल्हापुरमधील जवाहरनगर भागात राहणारे सौरभ विजयकुमार व्हटकर हे या परीक्षेत ६९५ क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. कराड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी मिळविल्यानंतर केंद्रीय स्पर्धा परीक्षेकडे लक्ष केंद्रित करून ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करत त्यांनी हे यश मिळवले. त्यांच्या आई गीता या एका मॉलमध्ये वरिष्ठ अधिकारी असून वडील सोलापूर मधील एका बँकेत रोखपाल आहेत.