कार चालवत असताना ह्रदयविकाराचा झटका आलेल्या चालकाच्या मदतीला वाहतूक पोलीस धावल्याने मोठा अनर्थ टळला. ठाण्यात खारेगाव टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. वाहतूक पोलिसाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे चालकाचा जीव वाचला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, कॉन्स्टेबल पंढरीनाथ मुंडे यांनी चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं पाहताच मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी चालकाला मागच्या सीटवर बसवत गाडीचा ताबा घेतला आणि गाडी नजीकच्या रुग्णालयात नेली. बुधवारी ही घटना घडली आहे.

‘२३ वर्षीय निखील तांबोळे कार चालवत होता. त्याच्यासोबत त्याचे वयस्कर वडीलदेखील होते. निखील पडघा येथून ठाण्याला चालला होता. १२.३० च्या सुमारास कार खारेगाव टोलनाक्यावर पोहोचली असता निखीलला ह्दयविकाराचा झटका आला’, अशी माहिती ठाणे पोलिसांच्या प्रवक्ता सुखदा नारकर यांनी दिली आहे.

कळवा वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असणारे पंढरीनाथ मुंडे त्यावेळी टोलनाक्याजवळ उपस्थित होते. चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याचं कळताच त्यांना अजिबात वेळ न दवडता त्यांनी चालकाला मागच्या सीटवर बसवलं आणि कार चालवायला घेतली असं सुखदा नारकर यांनी सांगितलं आहे.

पंढरीनाथ मुंडे यांनी कार थेट ज्युपिटर रुग्णालयात नेली आणि निखील तांबेळी यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या निखील तांबोळे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वाहतूक पोलीस डीसीपी अमित काळे यांनी कॉन्स्टेबल पंढरीनाथ मुंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं आहे.