जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढतांना मातीचा ढिगारा कोसळला. या  ढिगाऱ्याखाली दबून दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर दोन जणांना गंभीर दुखापत व चार जणांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मृतांमध्ये एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.

पावसाळाजवळ आल्यामुळे घरांच्या कुडांना लेप करण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव गावाशेजारील डोंगरावर माती घेण्यासाठी गेले होते.  कुटुंबातील नातेवाईक मिळून  ते एकुण आठ जण  होते, या आठ जणांमध्ये सात महिलांचा समावेश होता.
हे सर्वजन रस्त्यालगत असलेल्या डोंगरातील मातीचे खोदकाम करीत होते,  दरम्यान अचानक वरतून मातीचा ढिगारा कोसळला व खोदकाम करीत असलेल्या या कामगारांच्या अंगावर येऊन पडला. या वेळी डोंगराच्या एकदम जवळ असलेले मनोज यशवंत जाधव (30 वर्ष) व मुक्ता सुदाम तराळ (16 वर्ष )  हे दोघे ढिगाऱ्याखाली दबले  गेले.

या कोसळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात मोठाले दगड असल्याने या दोघांचाही मातीखाली दाबून घटनास्थळीच मृत्यू झाला. तसेच अन्य दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार जणांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर दुखापत झालेल्या दोन महिलांना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले.