वर्धा जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अशा जिल्ह्यांमधून वर्ध्यात येणारा भाजीपाला पुरवठा थांबवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात येणाऱ्या भाजीपाल्याची वाहतूक बंद करण्यात आल्याने भाज्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भात अशा प्रकारचा हा पहिलाच निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी वर्धा जिल्ह्यास अधिक सुरक्षित करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे. वर्धेलगतच्या काही जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. अशाच काही भागातून जिल्ह्यात भाजीपाला येतो. भाजीपाला घेवून येणाऱ्या वाहनचालकांच्या माध्यमातून करोनामुक्त वर्धा जिल्ह्यात प्रादुर्भाव होवू शकतो, या भीतीमुळे भाजीपाल्याची वाहतूक ८ ते १४ एप्रिलपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्याबाहेरून येणारा भाजीपाला, फळे, चिकन, मटण व मासे यांच्या वाहनास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र, जिल्हांतर्गत वाहतूक सुरू राहणार आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने अमरावतीवरून पालेभाज्या येतात. हा टिकावू माल नसल्याने वाहतूक ठप्प झाल्यावर पालेभाज्यांचे दर वाढू शकतात. तसेच लातूर व नागपूरवरूनही मोठ्या प्रमाणात भाजीपाला येथे येतो. संचारबंदीमुळे मात्र तो येणे बंदच आहे. दरम्यान, या निर्णयामुळे गाजराचा तुटवडा भासणार असे एका विक्रेत्याने स्पष्ट केले.

आणखी वाचा- Coronavirus : मच्छिमारांचा डिझेल परतावा रोखला

पुरेसा भाजीपाला उपलब्ध 

बटाटा व कांदे देखील वर्ध्याच्या बाहेरच्या जिल्ह्यातूनच येतात. मात्र, सध्या पुरेसा साठा उपलब्ध आहे. ठोक भाजी विक्रेते राजाभाऊ जोगे म्हणाले, “जिल्ह्यात भरपूर भाजीपाला आहे. मात्र, प्रत्येकच भाजीचा आग्रह नागरिकांनी करू नये. अपवाद वगळता कोणत्याच भाजीचा तुटवडा पडणार नाही. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तीन आठवडे पुरेल एवढा भाजीपाला उपलब्ध असल्याचे जोगे यांनी लोकसत्ताला सांगितले.