भाजप महायुतीतील चार मित्रपक्षांपकी तिघांना लाल दिवा मिळाल्यानंतर शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी मुंबईत मेळावा घेऊन भाजपने आपली फसवणूकच नव्हे, तर अपमान केल्याचा आरोप करत महायुतीतून बाहेर पडण्याची मानसिकता केली होती. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना मेळाव्याच्या ठिकाणी पाठवून दसऱ्यापर्यंत मेटे यांनाही सत्तेचा लालदिवा देण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे शिवसंग्रामचे कार्यकत्रे दसऱ्याकडे डोळे लावून बसले आहेत. या पाश्र्वभूमीवर दसऱ्यापर्यंत सरकारने निर्णय घेतला नाही तर त्यानंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, अशी प्रतिक्रिया आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पार्टीबरोबर महायुतीत रिपाइं, रासप, शेतकरी संघटना व शिवसंग्राम असे चार घटक पक्ष निवडणुकीपूर्वी सामील झाले होते. सत्तांतरानंतर दीड वर्ष घटक पक्ष सत्तेत कधी सहभाग होतो याची प्रतीक्षा करत होते, इशारेही देत होते.

अखेर काही महिन्यांपूर्वी केंद्रात रिपाइंचे रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद तर महाराष्ट्रात रासपचे महादेव जानकर यांना कॅबिनेट आणि शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रिपदाची संधी मिळाली.

मात्र, महायुतीतील चार घटक पक्षांपकी केवळ आमदार विनायक मेटे यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आले. भाजपने आश्वासन देऊन आपल्यासोबतच्या इतर घटक पक्षाच्या नेत्यांना मंत्री केले आणि आपल्याला मात्र बाजूला ठेवले. ही केवळ फसवणूक नाही तर अपमान आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत आमदार मेटे यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचीच तयारी चालवली होती. मुंबईत शिवसंग्रामच्या सर्व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन भाजपने कसा अपमान केला, याबाबतची भूमिका त्यांनी मांडली. त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना शिवसंग्रामच्या मेळाव्यात पाठवले. त्या वेळी चंद्रकांत पाटील यांनी आमदार मेटे यांनी लवकरच सत्तेत सहभागी करून घेण्याची ग्वाही दिली.

दसऱ्यापर्यंत आमदार मेटे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असे मानले जात होते. त्यांचे कार्यकत्रेही दसऱ्याकडे डोळे लावून बसले आहेत. पण सरकार पातळीवर कसलीही हालचाल नसल्याचे दिसून येते.

या पाश्र्वभूमीवर बीड येथे आमदार विनायक मेटे यांनी दसऱ्यापर्यंत वाट पाहू, त्यानंतर निर्णय घेऊ; अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे भाजप नेतृत्व आमदार मेटेंना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करते का? याकडे आता त्यांच्या कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.