भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात असंतोष असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि १२ डिसेंबरला आपण निर्णय सांगू असं पंकजा म्हणाल्या. त्यानंतर भाजपानं सोमवारी खुलासा केला होता. मात्र, चर्चा सुरूच असल्यानं मंगळवारी भाजपाचे नेते विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे दरवर्षी अशी पोस्ट टाकतात. पण, यावेळी त्यांच्या पोस्टचा विरोधकांनी विपर्यास केला. त्यामुळे त्या व्यथित झाल्या आहेत.”

सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपातील काही नेते बंडाचे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर भाजपाचे अनेक बडे नेते संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन “पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,” असा खुलासा करावा लागला.

भाजपाचेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी “पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करुन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाडलं आहे. रोहिणी खडसे यांचा त्यामुळेच पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचंही असंच म्हणणं आहे,” असा दावा केल्यानं पुन्हा मंगळवारी चर्चा सुरू झाली.

या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दुपारी बबनराव लोणीकर यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यानंतर विनोद तावडे आणि माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मुंबईत भेट घेतली. त्यानंतर बोलताना विनोद तावडे म्हणाले, “पंकजा मुंडे भाजपातच आहेत. असा कोणताही निर्णय त्या घेणार नाहीत. अशी पोस्ट त्या दरवर्षी करतात. मात्र, आजच्या राजकीय वातावरणात त्यांच्या पोस्टचा विरोधकांकडून वेगळा अर्थ लावण्यात आला. त्यामुळे त्या व्यथित आहेत,” अशी माहिती तावडे यांनी दिली.