राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक येत आहेत याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली असता, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना निवडून कोण देतं? असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तिकिट मिळू नये आणि मिळालेच तर ते निवडून येऊ नये यावर सगळ्यांचे एकमत आहे. मात्र अरूण गुजराथींसारखा सज्जन माणूस हरलेला आणि अरूण गवळी जिंकून आलेला आम्ही पाहिला आहे. गुन्हेगाराला मत न देण्याचा पर्याय तुमच्याकडे असतो तरीही त्याला मतं दिली जातात अशी खंतही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली आहे. #Lok मंच नागपूर या भाडिपा अर्थात भारतीय डिजिटल पार्टीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरंही दिली आणि आपली परखड मतंही मांडली.

लोकशाही प्रक्रियेत मतदार किती योगदान देतात? मुंबई-नागपूर सारख्या शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी 50 ते 55 टक्के असते. तुम्हाला वाटत असेल की आपल्या प्रभागात योग्य उमेदवार नाही तर तुम्ही ‘नोटा’ हा पर्यायही निवडू शकता. खरंतर हा पर्याय नसावा असं मला वाटतं पण लोक या पर्यायाचा वापर करण्यासाठीही बाहेर पडत नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. आम्ही मतदानाला जात नाही आणि चुकीची माणसे निवडून येतात याकडे बोट दाखवतो अशी अनेकांची प्रवृत्ती असते असेही त्यांनी म्हटले आहे.

चांगली माणसं हवी असतील तर चांगल्या माणसांना राजकारणात यावं लागेल. आम्ही अनेकांना जेव्हा सांगतो की तुम्ही राजकारणात या तेव्हा ते आम्हाला सांगातात की राजकारण हे आमचं क्षेत्र नाही मग हे क्षेत्र सुधारणार कसं? व्यवस्था सुधारण्याची इच्छा असेल तर व्यवस्थेत सहभागी व्हावं लागेल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.