“तौते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.” असा आरोप राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादा काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

“तौते चक्रीवादळाबाबत भारतीय हवामान विभाग व राज्य सरकारच्या माध्यमातून वारंवार सतर्कतेचा इशारा देण्यात आला असतानाही ओएनजीसीने या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ७०० कामगारांचा जीव धोक्यात टाकला. दरम्यान एक बार्ज बुडाल्याने ३७ जणांचा मृत्यू झाला, अजुनही ४० पेक्षा अधिकजण हे बेपत्ता आहेत. शेकडो लोकं रात्रभर मृत्युशी झुंज देत असताना, कोस्ट गार्डने, नौदलाने त्यांना वाचवलं. या सर्व घटनेची जबाबदारी निश्चित झाली पाहीजे. याची जबाबदारी ओएनजीसीचीच आहे. ओएनजीसीने सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न केल्यानेच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला.” असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

तसेच, “ही घटना समोर आल्यानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चौकशी नेमणार असल्याचे सांगितले. मात्र फक्त चौकशी करून चालणार नाही. जे या घटनेला जबाबदार आहेत त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे. ओएनजीसी सांगत आहे की अफकॉन्सची जबाबदारी आहे, अफकॉन्स म्हणत आहे की बार्ज मालकाची जबाबदारी आहे, असं चालणार नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा मिळायला हवी.” अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

“P-305 दुर्घटना मानवनिर्मितच, मोदी सरकार चुकांमधून कधी शिकणार?” काँग्रेसचा गंभीर आरोप!

दरम्यान, तौते चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये ओएनजीसीसाठी तेल उत्खनन करणारा P-305 हा तराफा बुडाल्याची दुर्घटना ही पूर्णपणे मानवनिर्मित असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, ही पूर्णपणे मानवनिर्मित दुर्घटना असून त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी काँग्रेसकडून पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तौते चक्रीवादळामध्ये हा तराफा भरकटला आणि बुडाला असं सांगण्यात येत असून त्यानंतर भारतीय नौदलाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. अजूनही उरलेल्या कर्मचाऱ्यांसा शोध सुरू असल्याचं नौदलाकडून सांगण्यात आलं आहे.