राज्यातील सत्तासंघर्षाला शनिवारी अगदीच अनेपेक्षित कलाटणी मिळाली. शुक्रवार रात्रीपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत येईल असं वाटत असतानाच अचानक शनिवारी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर शरद पवारांनी भाजपाला पाठिंबा देण्याचा अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र शनिवारपासून अजित पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. याचसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उदाहरण दिले.

राऊत यांनी आज सकाळी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. याच पत्रकार परिषदेमध्ये राऊतांना “अजित पवारांचे मन वळवण्याचा राष्ट्रवादीचे नेते प्रयत्न करत आहेत त्याबद्दल काय सांगाल?,” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राऊतांनी “कुटुंबामध्ये फूट पडू नये अशी भावना असते, त्यातूनच हे प्रयत्न सुरु आहेत,” असं मत व्यक्त केलं. “अनेक नेते हे एकमेकांचे सहकारी असतात त्यांनी अनेक वर्ष एकमेकांसोबत काम केलंलं असतं. बाळासाहेब ठाकरेंनी मला वारंवार राज ठाकरेंना भेटायला पाठवलं होतं. शेवटपर्यंत प्रयत्न करायचे असतात. भावनेच्या भरात एखादा माणूस निर्णय घेत असतो. छगन भुजबळ भेटायला गेलेत ते त्यांचे सहकारी होते,” असंही राऊत पुढे बोलताना म्हणाले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना “अजित पवारांचे मन वळवण्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांना यश आल्यास शिवसेना त्यांना माफ करणार का?,” असा प्रश्न विचारला. “हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे त्याचं माझ्याशी काही देणघेणं नाही,” असं राऊत म्हणाले.

दरम्यान, अजित पवारांचे मन वळवण्यासाठी राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते त्यांची भेट घेताना दिसत आहेत. सोमवारी सकाळी छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनिल तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते एकनाथ शिंदे यांनीही अजित पवार यांची भेट घेतल्याचे समजते.