25 September 2020

News Flash

विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मनसेत दुमत, सूत्रांची माहिती

राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

विधानसभा निवडणूक लढवाची की नाही यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये दुमत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेने २०१९ मधली लोकसभा निवडणूकही लढवली नव्हती. मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे काय करणार ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणूक लढवायची की नाही यावर चर्चा झाली. मात्र निर्णय काय झाला ते जाहीर करण्यात आलेले नाही. योग्य वेळी राज ठाकरे निर्णय जाहीर करतील असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकीत निवडणूक लढवायची की नाही याबाबत नेत्यांची मतं जाणून घेतली. काही नेत्यांनी निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर काहींनी नाही, मात्र आता नेमके काय होणार, पुढे काय भूमिका जाहीर करायची याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर करतील असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक न लढवता मनसेने मोदी विरोधी प्रचार केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शाह यांना हटवा असं आवाहन करत १० सभा घेतल्या होत्या. “लाव रे तो व्हिडीओ” हे सांगणाऱ्या त्यांच्या सभाही खास गाजल्या होत्या.  मात्र प्रत्यक्षात या सभांचा काहीही परिणाम झाला नाही हे लोकसभा निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक निकालाबाबत ‘अनाकलनीय’ अशी एका शब्दाची प्रतिक्रियाही दिली. आता विधानसभा निवडणूक मनसे लढवणार की नाही याबाबत मनसेच्या नेत्यांमध्ये दुमत असल्याचे समजते आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधातही आवाज उठवला. सगळ्या विरोधकांची मोटही राज ठाकरे यांनी बांधली. मात्र राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? हा प्रश्न कायम आहे. निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका काही नेत्यांनी घेतली आहे. जेणेकरुन कार्यकर्त्यांमध्ये एक सकारात्मक संदेश जाईल असे काही नेत्यांनी म्हटले आहे. तर काहींनी निवडणूक लढवू नये अशी भूमिका घेतली आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील, ते निर्णय घेतल्यावर जाहीर करतील असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2019 4:27 pm

Web Title: mns will contest assembly elections or not its not decided yet says sources scj 81
Next Stories
1 “मी आज राष्ट्रवादीतच, उद्याचं उद्या पाहू” : रामराजे निंबाळकर
2 राज्यातील विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी; मुंबई हायकोर्टात जनहित याचिका
3 दिल्लीत नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत उदयनराजे करणार भाजपात जाहीर प्रवेश
Just Now!
X