लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला भगदाड पडले. पवारांच्या वर्तुळातील नेत्यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी हातातील घड्याळ काढून भाजपाचे कमळ हाती घेतले. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भडकले आहेत. “ज्या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, बेरोजगारी वाढली. त्या पक्षात काही लोक सत्तेसाठी जात आहेत”, अशा शब्दात पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांचा समाचार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा मेळावा रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना टोला लगावला. शरद पवार म्हणाले,”विरोधी पक्षात बसून जास्त कामे करून घेता येतात. महागाई आणि बेरोजगारीसारखे प्रश्न देशात निर्माण झाले आहेत. केंद्रातील आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढल्या आहेत. नोकऱ्या निर्माण करण्याऐवजी या सरकारच्या काळात बेरोजगारी वाढली आहे. मग त्यांच्याकडे कशासाठी जायचं”, असा सवाल करत पवारांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना सुनावले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई, कोकण, मराठवाड्यातील अनेक नेत्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपा-शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते गणेश नाईक आणि साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांनीही नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याशिवाय इतर काही नेत्यांचा प्रवेश शिवसेना, भाजपात होण्याची शक्यता आहे. यात छगन भुजबळ, आमदार रामराजे निंबाळकर या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. याआधी शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहिर, संदीप नाईक, राणाजगजीत सिंह, चित्रा वाघ, धनंजय महाडिक, दिलीप सोपल, मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, विजयसिंग मोहिते पाटील यांचा मुलगा रणजीत सिंग मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar angry on party left leader bmh
First published on: 15-09-2019 at 17:48 IST