महायुतीच्या उमेदवारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी १० मे रोजी पुण्यात सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारासाठीची ठाकरे यांची ही दुसरी सभा असून, राज ठाकरे या सभेत कोणावर तोफ डागणार, याबाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सारसबाग चौक येथे सायंकाळी पाच वाजता ही सभा होणार आहे.

भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारानिमित्त ही सभा होणार आहे. सभेला मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अमित ठाकरे यांच्यासह भाजप आणि मनसेचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांनी यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासाठी कोकणात सभा घेतली होती.

हेही वाचा…मुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम पूर्ण

त्यानंतर महायुतीच्या उमेदवारासाठीची ही त्यांची दुसरी सभा होणार आहे. या सभेची तयारी अंतिम टप्प्यात असून, वाहतुकीला अडथळा होऊ नये, या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.