पुणे, मुंबई आणि ठाणे या महानगरांमधील मतदानाची टक्केवारी कमी असते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून मतदान जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले. पुणे, मुंबई आणि ठाणे परिसरातील लोकसभा मतदार संघांमध्ये अनुक्रमे १३ मे आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. या दोन्ही दिवशी सोमवार असल्याने शनिवार, रविवार लागून सुट्या असल्याने मतदानाचा टक्का घसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई आणि ठाण्यातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे अधिकार देण्यात आले असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी या पदाधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंटचे प्रमाण जास्त असून तेथील मतदारांची संख्या अधिक आहे. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान होण्यासाठी ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदानाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मतदारांना मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी तयार करण्यात आलेला क्यूआर कोड संस्थेच्या दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.

हेही वाचा…बाँम्बस्फोटातील आरोपी अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारफेरीत, भाजप आमदार अमित साटम यांचा आरोप

मतदार ओळखपत्र आणि मतदार ओळखचिठ्ठी देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी समन्वय ठेऊन जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थामध्ये मतदान होईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयात गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठकी घेतली. पुणे शहर जिल्हा उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण), पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांच्यासह पुणे, पिंपरी-चिंचवडमधील विविध गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते, असे पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.

हेही वाचा…कोकण रेल्वेवर ब्लॉक, रेल्वेगाड्या खोळंबणार

याबाबत बोलताना ठाणे जिल्हा को-ऑप. हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे म्हणाले, ‘२० मे रोजी ठाणे, मुंबई या ठिकाणच्या लोकसभेच्या जागांसाठी मतदान होणार आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाने आपल्या स्तरावर विविध प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीतील मतदार असलेल्या प्रत्येक सभासदाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, मतदान करावे आणि आपल्या सोसायटीमधील मतदान १०० टक्के होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. ही जबाबदारी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर दिली आहे. यातून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मदत करायची आहे. ज्या सोसायट्यांमधून १०० टक्के मतदान होईल, त्यांचा सत्कार जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन करण्यात येणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, त्यांना जिल्हा प्रशासन, नजीकचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनकडून सहकार्य करण्यात येईल.’