|| जयेश सामंत

नऊपैकी आठ जागांवर विजय; तर भाईंदरमध्ये पक्षाच्याच बंडखोराची सरशी; शिवसेनेचा चार जागांवर पराभव : – ठाणे जिल्हा.. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी घोषणा देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला वाकुल्या दाखविणाऱ्या शिवसेनेला सलग दुसऱ्या विधानसभा निवडणुकीत पिछाडीवर जावे लागले आहे. जिल्यातील १८ जागांचे निम्मे-निम्मे वाटप करून घेण्यात यश मिळवणाऱ्या शिवसेनेला निवडणूक निकालात मात्र समसमान जागा राखता आल्या नाहीत. भाजपने नऊपैकी आठ जागा जिंकून जिल्यात पहिला क्रमांक पटकावला. तर, मीरा-भाईंदरमध्ये या पक्षाच्याच बंडखोर उमेदवार गीता जैन निवडून आल्याने भाजपला जिल्यात ‘शत-प्रतिशत’ यश मिळवण्याची संधी आहे. दुसरीकडे, नऊ जागा लढवणाऱ्या शिवसेनेला पाच जागांवरच विजय मिळवता आला. कळवा-मुंब्रा, भिवंडी पूर्व या मतदारसंघांसोबतच कल्याण ग्रामीण आणि शहापूर या बालेकिल्ल्यांतही शिवसेनेला पराभवाची धूळ चाखावी लागली.

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्य़ात शिवसेनेची अनेक वर्षांपासून ताकद राहिली आहे. पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने शिवसेनेला जोरदार धक्का देत १८ पैकी आठ जागांवर विजय मिळवत पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून वर्चस्व मिळवले होते. तेव्हापासून जिल्ह्य़ात झालेल्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या दोन पक्षांमध्ये अतितटीचा सामना झालेला पहायला मिळाला. ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांपाठोपाठ जिल्हा परिषदेतही शिवसेनेने भाजपला चितपट केल्यामुळे युतीच्या जागावाटपात या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी नऊ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. नवी मुंबईतील बेलापूरच्या बदल्यात कल्याण पश्चिमेची जागा भाजपकडून पदरात पाडून घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी समान जागा वाटपाचा आग्रह मुख्यमंत्र्यांकडून पदरात पाडून घेतला. असे असले तरी निवडणुक निकालांमध्ये मात्र भाजपने शिवसेनेपेक्षा अधिक जागांवर

विजय मिळवत पुन्हा एकदा

जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पक्षाच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला पराभव पत्करावा लागल्याने जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याची मोठी संधी पक्षाने गमावली आहे.

कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना उमेदवारी नाकारली होते. येथून रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, मनसेचे राजू पाटील यांनी म्हात्रे यांचा अत्यंत चुरशीच्या लढतीत सहा हजार मतांनी पराभव करून शिवसेनेला आणखी एक धक्का दिला. या दोन मतदारसंघासह भिवंडी पूर्वेत शिवसेनेचे दोन वेळा आमदार राहिलेले रूपेश म्हात्रे यांनाही समाजवादी पक्षाकडून पराभवाचे तोंड पहावे लागले.

कळवा-मुंब्रा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठय़ा मताधिक्याने पराभूत केले आहे. शिवसेनेच्या तुलनेत भाजपने मात्र नऊ जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवला असून मीरा-भाईदर मतदारसंघात पक्षाचे अधिकृत उमेदवार नरेंद्र मेहता यांना बंडखोर उमेदवार गीता जैन यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला आहे. मेहता यांच्या पराभवात शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी महत्वाची भूमिका बजाविल्याची चर्चा असून यामुळे भाजपचा जिल्ह्य़ात नऊ पैकी नऊ जागांवर विजय मिळविण्याचा आनंद हिरावला गेला आहे.

शहापुरातील अदलाबदल भोवली!

भाजपसोबत जागा वाटप करताना शिवसेनेने कल्याण पश्चिमेसह शहापूर विधानसभा मतदारसंघही आग्रहाने मागून घेतला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत येथून पक्षाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे शहापूर मतदारसंघातून शिवसेनेला विजयाची खात्री होती. हे करत असताना शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेने चार महिन्यांपूर्वी पक्षात प्रवेश दिला आणि नंतर उमेदवारीही दिली. मात्र, तिकीट नाकारल्याने ऐनवेळेस राष्ट्रवादीत प्रवेश करणारे शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांनी येथे पांडुरंग बरोरा यांना धूळ चारली.

शहरांमध्ये अस्तित्वाचे आव्हान

जिल्ह्य़ातील चार जागांवर पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने शिवसेनेला शहरी भागातील अस्तित्वासाठी यापुढे भाजपशी झुंजावे लागणार आहे. कल्याण-डोंबिवीली महापालिका हद्दीत शिवसेना-भाजपने प्रत्येकी दोन जागा लढविल्या होत्या. त्यापैकी दोन जागांवर भाजपने विजय मिळवला असून शिवसेनेला कल्याण पश्चिमेतील अवघ्या एका जागेवर विजय मिळविता आला आहे. ठाणे महापालिका हद्दीत चारपैकी दोन जागा भाजप आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याने तेथेही शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले आहे. नवी मुंबई महापालिका हद्दीत शिवसेनेने दोन्ही जागा भाजपा देऊ केल्याने तेथेही पक्षाला अस्तिव टिकविण्यासाठी झुंजावे लागेल असे चित्र आहे. भिवंडी महापालिका हद्दीतही रूपेश म्हात्रे यांच्या पराभवामुळे पक्षाचा एकही आमदार राहिलेला नाही.