काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. आम्हाला सत्ता स्थापनेसच्यादृष्टीने पुढे जाण्यास हायकमांडकडून सिग्नल मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याचबरोबर, शिवसेनेबरोबर जर काँग्रेस जात आहे तर या अगोदर हायकमांडकडून काय करण्यास सांगण्यात आले आहे याबद्दलही त्यांनी माहिती दिली आहे.
माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही सर्वजण भेटून आज निर्णय घेणार आहोत. सरकार स्थापनेसाठी आम्हाला हायकमांडने सिग्नल दिला आहे. मात्र, किमान सामायिक कार्यक्रमानुसार आम्ही पुढे जाऊ. जर शिवसेनेबरोबर जायचे असेल, तर आम्हाला हायकमांडने किमान सामायिक कार्यक्रम निश्चित करून पुढे जावे, असे सांगितले. शेवटी त्यांच्यासमोर पण आम्हाला सर्व घडामोडी मांडाव्याच लागतील. आज या पार्श्वभूमीवर जर आम्ही एकत्र येऊन चर्चा करतो किंवा काही सूत्र ठरते, तर आम्ही पुढे जाऊ. यासाठीच तर आम्हाला हायकमांडने सिग्नल दिला आहे.
दिवसेंदिवस राज्यात सत्तास्थापनेचा पेच वाढत चालला आहे. शिवसेना आणि भाजपाला सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यामुळे राज्यपालांनी राष्ट्रवादीला आमंत्रण दिलं आहे. राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचं सध्या पवारांकडे लक्ष लागले आहे. भाजपा, शिवसेना यांच्यानंतर राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यास राज्यात सरकार स्थापन होणार की, राष्ट्रपती राजवट असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.