04 July 2020

News Flash

Exit Poll: …या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचा अंदाज चुकला

जाणून घ्या कोणत्या निवडणुकांमध्ये चुकला होता एक्झिट पोलमधील अंदाज

एक्झिट पोलचा अंदाज चुकला

Exit Poll: सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पडलं असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २४ ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. कोण, जिंकणार कोण हरणार? कोण सत्ता स्थापन करणार? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या एक्झिट पोलमध्ये केला जाणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात एक्झिट पोलबाबतची उत्सुकता वाढली आहे. पण एक्झिट पोलमधील अंदाज प्रत्यक्षात कितपत खरे ठरतात, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतात. काही निवडणुकांमध्ये एक्झिट पोलमधील अंदाज चुकल्याचे समोर आले असून या निवडणुकांचा घेतलेला आढावा…

२०१५ मधील दिल्ली विधानसभा निवडणूक

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या वर्षभरानंतर दिल्लीत विधानसभा निवडणूक पार पडली. केंद्रातील मोदी सरकारसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची समजली जात होती. दिल्लीत भाजपा विरुद्ध काँग्रेस विरुद्ध आप अशी तिरंगी लढत होती. मोदी सरकारच्या वर्षभरातील कामगिरीवर जनतेला काय वाटते, या दृष्टीने भाजपासाठी ही निवडणूक महत्त्वाची होती. तर दिल्लीत स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची संधी आपकडे होती आणि १५ वर्षांच्या सत्तेनंतर दिल्लीत काँग्रेसची स्थिती काय आहे, हे या निवडणुकीतून समोर येणार होते. बहुसंख्य एक्झिट पोलमध्ये दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय होणार असे म्हटले होते. मात्र, ‘आप’कडे काठावरचे बहुमत असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. दिल्लीत विधानसभेच्या ७० जागा आहेत. पण दिल्लीत एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकले. आम आदमी पक्षाने ४० ते ४५ ऐवजी तब्बल ६७ जागांवर विजयी मिळवला. ‘आप’ ला एक्झिट पोलमधील अंदाजापेक्षा तब्बल २२ जागा जास्त मिळाल्या.

बिहारमध्ये चुकलेला अंदाज

बिहारमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतही एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. त्यावेळी बिहारमध्ये भाजपा विरुद्ध महाआघाडी अशी लढत होती. महाआघाडीत नितीश कुमार यांच्या जनता दल संयुक्त, लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश होता. महाआघाडीची भिस्त नितीशकुमार यांच्यावर होती. तर बिहारमध्ये भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपा ही निवडणूक लढवत होती. विशेष म्हणजे त्यावेळी नितीशकुमार आणि नरेंद्र मोदींमधील संबंधांमध्ये तणाव होता. त्यामुळे दिग्गजांच्या या लढाईत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. बिहारमध्ये विधानसभेच्या २४३ जागा आहेत. एक्झिट पोलमधील अंदाजात भाजपाप्रणित ‘एनडीए’ला १०० ते १२७ जागा आणि महाआघाडीला त्या पेक्षा कमी जागा मिळतील, असे म्हटले होते. पण निकालात एक्झिट पोलचे अंदाज चुकल्याचे स्पष्ट झाले. भाजपाप्रणित एनडीएला फक्त ५८ जागांवर समाधान मानावे लागले. तर महाआघाडीने १७८ जागा जिंकून बहुमताचा आकडा सहज ओलांडला होता. सहा पैकी दोन एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तरी चार एक्झिट पोलचे अंदाज चुकले होते. विशेष म्हणजे अंदाज चुकल्याने ‘चाणक्य’ या एक्झिट पोलमधील ख्यातनाम संस्थेला दिलगिरी व्यक्त करावी लागली होती.

२००४ मध्ये वाजपेयींचा एक्झिट पोलमध्ये विजय, पण प्रत्यक्ष निकालात पराभव

२००४ मध्ये भाजपाने ‘इंडिया शायनिंग’ ही मोहीम राबवत लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होते. त्यावेळी एक्झिट पोलमध्ये वाजपेयी सरकारला दुसरी टर्म मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपाप्रणित एनडीएला ५४३ पैकी २३० ते २७५ जागांवर विजय मिळणार, असे एक्झिट पोलमध्ये म्हटले होते. पण मतमोजणीच्या दिवशी एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचे स्पष्ट झाले. ‘इंडिया शायनिंग’ ही मोहीम भाजपाला विजय मिळवू देऊ शकली नाही. भाजपाप्रणित एनडीएला फक्त १८५ जागांवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसप्रणित यूपीएला तब्बल २१८ जागांवर विजय मिळाला. निकालानंतर समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, डावे पक्ष यांनी काँग्रेसला बाहेरुन पाठिंबा दिला होता.

या तीन निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे अंदाज सपशेल चुकल्याचे दिसत असले तरी अनेक निवडणुकांमध्ये एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले होते. त्यामुळे एक्झिट पोलवर पूर्णपणे अविश्वास दाखवणेही चुकीचे ठरु शकते. वाचक/ प्रेक्षकांनी एक्झिट पोल हा फक्त अंदाज असून एक्झिट पोल म्हणजे अंतिम निकाल नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2019 8:00 pm

Web Title: three times when exit poll prediction went wrong scsg 91
Next Stories
1 Exit Poll: एक्झिट पोल म्हणजे काय?; कसा व्यक्त केला जातो अंदाज
2 टीव्ही ९ सिसेरोचा एक्झिट पोल म्हणतो पुन्हा एकदा युतीचंच सरकार
3 रुग्णवाहिका न मिळाल्याने प्रसूतीनंतर अभिनेत्रीचा मृत्यू
Just Now!
X