आघाडीसह वंचित, एमआयएम प्रभावहीन

औरंगाबाद जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील सहाही मतदारसंघात महायुतीचेच उमेदवार विजयी झाले. ओवेसींच्या भावूक भाषणाचे रूपांतर एमआयएमला विजयात करता आले नाही, तर एमआयएमबरोबर फारकत घेतल्यामुळे वंचित बहुजन आघाडीही प्रभावहीन झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद जिल्ह्य़ात तशी नव्हतीच. वैजापूरची एक राष्ट्रवादीची जागा त्यांना राखता आली नाही. संदीपान भूमरे, उदयसिंह राजपूत, रमेश बोरनारे, अब्दुल सत्तार हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, तर प्रशांत बंब आणि हरिभाऊ बागडे यांनी ग्रामीण भागात कमळ चिन्हाचा झेंडा पुन्हा उंचावला.

पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे संदीपान भुमरे यांनी सलग पाचवा विजय संपादन केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्ता गोर्डे यांचा १४ हजार १३९ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीकडून ऐनवेळी माजी आमदार वाघचौरे यांच्याऐवजी दत्ता गोर्डे यांना उमेदवारी देण्यात आली होती. गोर्डे यांनी ६९ हजार २६४ मते घेतली, तर भुमरे यांना २४ व्या फेरीत ८३ हजार ४०३ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे विजय चव्हाण यांना २० हजार ४२४ तर एमआयएमचे प्रल्हाद राठोड यांना १६ हजार ९१२ मते मिळाली. नोटाला एक हजार ९९७ मते दिली गेली.

गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब हे विजयी झाले. बंब यांनी सलग तिसरा विजय नोंदवत राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने यांचा ३४ हजार ९०० मतांनी पराभव केला. फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ उमेदवार हरिभाऊ बागडे हे १५ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांचा पराभव केला. बागडे यांचे ७५ वर्षे ओलांडलेले वय पाहता त्यांचा विजय चर्चेचा विषय ठरला आहे. बागडे यांना १६ व्या फेरीअखेर ६९ हजार ७१० मते, तर डॉ. कल्याण काळे यांना ५९ हजार ३६३ मते मिळाली होती. बागडे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीदरम्यान बागडे यांची आघाडी वाढत गेली. काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे हे जिल्ह्य़ातील एकमेव उमेदवार होते. गतवेळीपेक्षा बागडे यांचा आजचा विजय मोठा ठरला आहे. २०१४ च्या निवडणुकीत बागडे व डॉ. कल्याण काळे यांच्यातच अत्यंत अटीतटीची लढत झाली होती. त्यात बागडे यांचा अवघ्या २ हजार मतांच्या फरकाने निसटता विजय झाला होता.

कन्नड मतदारसंघात शिवसेनेने मोठा जोर लावला होता. हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. त्यात त्यांनी २ लाख ७५ हजारपेक्षाही अधिकची मते घेतली होती. त्याचा फटका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना बसला. या दोघांच्या लढाईत एमआयएमचे इम्तियाज जलील हे लोकसभेवर निवडून गेले. त्या पराभवाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कन्नडच्या सभेत जाधव यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला हर्षवर्धन जाधव यांनीही अश्लाघ्य भाषेचा वापर करत उत्तर दिले होते. त्यामुळे संतापलेल्या काहीजणांनी जाधव यांच्या औरंगाबादेतील घरावर दगडफेक केली होती. या वादामुळे कन्नडची निवडणूक जिल्ह्य़ात चर्चेचा विषय ठरली होती.

वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरणारे हे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह पाटील चिकटगावकर यांचा पराभव केला. रमेश बोरणारे यांनी अखेरच्या टप्प्यात हाती आलेल्या माहितीनुसार ५२ हजार ७६२ मते घेतली होती. तर अभयसिंह चिकटगावकर यांना ३५ हजार ४२३ मते मिळाली होती.

जिल्ह्य़ातील सर्वाधिक लक्षवेधक म्हणून सिल्लोड मतदारसंघातील निवडणुकीकडे पाहिले गेले. सिल्लोडमध्ये काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले अब्दुल सत्तार हे विजयी झाले. सत्तार यांनी तब्बल एक लाख २२ हजार ६२७ मते घेऊन अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा २४ हजार ४६५ मतांनी पराभव केला. पालोदकर यांना सुरुवातीला काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी ती नाकारून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. शिवाय त्यांना इतर पक्षांचाही छुपा पाठिंबा मिळत आहे, असे चित्र सिल्लोडमध्ये निर्माण केले गेले होते. मात्र सत्तार यांनी पक्ष कोणताही असो, मतदारसंघावर आपलेच वर्चस्व राहू शकते, हे दाखवून दिले.