अलिबाग – शिवसेनेतून भाजपात प्रवेश केलेल्‍या माथेरानमधील १० नगरसेवकांना जिल्‍हाधिकारी डॉ. महेंद्र कल्‍याणकर यांनी अपात्र ठरवले आहे. महाराष्ट्र स्थानिक प्रधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम १९८६ च्या कलम ३ (१) आणि महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८७ च्या कलम ८ (१) मधील तरतुदींनुसार अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. पक्षांतर करणे या दहा जणांना महागात पडले आहे.

अंतर्गत वादामुळे माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्‍या १० नगरसेवकांनी २७ मे २१ रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. कोल्‍हापूर येथे भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला होता. यानंतर शिवसेनेने या पक्षप्रवेशास आक्षेप नोंदवला. या सर्व १० नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करावे यासाठी शिवसेना सचिव अनिल देसाई व माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी जिल्‍हाधिकारी यांच्‍याकडे तक्रार केली होती.

२७ ऑक्टोबर २१ रोजी तक्रार अर्जावर अंतिम सुनावणी पार रडली होती. दोन्‍ही बाजूचे युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा निकाल दिला आहे. रुपाली तुकाराम आखाडे, प्रियंका विनोद कदम, ज्योती कैलास सोनावळे, प्रतिभा प्रदीप घावरे, संदीप नारायण कदम, सुषमा कुलदीप जाधव, आकाश कन्हैया चौधरी, राकेश नरेंद्र चौधरी, सबिना गुलमहोम्मद खान उर्फ सोनम सचिन दाभेकर या नऊ निवडून आलेल्या तर चंद्रकांत धोंडू जाधव या स्विकृत नगरसेवकांना जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी अनर्ह ठरवले आहे. आगामी नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने भाजपच्या बंडखोर नगरसेवकांना जोरदार धक्का बसला आहे.