Local Bodies Elections in Maharashtra: लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये नावं वाढवण्याचा व कमी करण्याचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलेलं असतानाच आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाची एक नवीन आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार गेल्या ७ महिन्यांत महाराष्ट्रात तब्बल १४ लाख ७१ हजार मतदारांची वाढ झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सध्या सर्वच पक्ष कामाला लागल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी समोर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ महिन्यांत होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ पर्यंत अपडेट झालेल्या मतदार याद्या वापरण्यात येणार आहेत. त्या याद्यांमधील आकडेवारीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानासाठी पात्र असणाऱ्या मतदारांची संख्या ९ कोटी ८४ लाख इतकी आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.
७ महिन्यांत इतके मतदार वाढले!
दरम्यान, निवडणूक आयोगाच्याच माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांवेळी, म्हणजेच २७ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदारांची संख्या ही ९ कोटी ७० लाख इतकी होती. त्यामुळे २७ नोव्हेंबर ते १ जुलै या जवळपास ७ महिन्यांमध्ये मतदारांची संख्या तब्बल १४ लाख ७१ हजार इतकी वाढल्याचं स्पष्ट झालं आहे. वास्तविक मतदारांच्या संख्येत मूळ १८ लाख ८० हजारांची वाढ झाली असून त्यातून ४ लाख ९ हजार मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. त्यामुळे अंतिम वाढ ही १४ लाख ७१ हजार इतकी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सर्वाधिक वाढ ठाणे जिल्ह्यात
दरम्यान, महाराष्ट्रात मतदारांच्या संख्येत सर्वाधिक वाढ ही ठाणे जिल्ह्यात झाली आहे. एकूण नव्या मतदारांची संख्या २ लाख ७१ हजारांच्या घरात आहे. मात्र, ४५ हजार ८०० नावं वगळण्यात आल्यानंतर अंतिम वाढ ही २ लाख २५ हजार इतकी आहे.
ठाण्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची मतदार वाढ ही पुण्यात झाली आहे. त्यात एकूण वाढ २ लाख २६ हजार असून ४२ हजार ९६१ नावं वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम वाढ ही १ लाख ८२ हजार इतकी आहे. ठाण्याच्या शेजारच्या पालघरमध्ये वगळण्यात आलेल्या मतदारांनंतर अंतिम वाढीचा आकडा हा ९७ हजार १०० इतका आहे.
या यादीत मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईत एकूण मतदारसंख्या ३३ हजार २०१ ने वाढली. मात्र, १४ हजार ४६० नावं वगळण्यात आली. त्यामुळे मुंबईतली अंतिम मतदार वाढ ही १८ हजार ७४१ इतकी आहे. मुंबई उपनगरात झालेली अंतिम मतदार वाढ ही ९५ हजार ६३० इतकी आहे. ४४ हजार १७२ मतदार वगळण्यात आल्यानंतर हा आकडा स्पष्ट झाला आहे.
घर बदलल्यामुळे सर्वाधिक मतदारांची वाढ
दरम्यान, वाढ झालेल्या १४ लाख मतदारांपैकी सर्वाधिक १ लाख ९६ हजार मतदार हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे वाढले आहेत. पुण्यात सर्वाधिक ३२ हजार ०३१ स्थलांतरित मतदार वाढले आहेत. त्यापाठोपाठ ठाण्यात हे प्रमाण २७ हजार ३८६ तर मुंबई उपनगरांत हे प्रमाण २५ हजार ८३१ इतके आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका काय?
नवीन मतदार याद्या वापरण्यासंदर्भात सरकारमधील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने भूमिका मांडली आहे. “आधी विधानसभा निवडणुकीवेळच्या याद्याच वापरण्याची चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर निर्णय बदलण्यात आला व १ जुलैपर्यंतच्या याद्या वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन मतदारांची भर पडण्याची प्रक्रिया ही सतत चालणारी असून ती कधीच थांबत नाही”, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.