मुंबई, नागपूर : येत्या ४८ तासांत मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून राज्यात अनेक ठिकाणी बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. विदर्भातील पूरपरिस्थिती गंभीर असून आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने राज्यात मंगळवापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला असून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांत ६४ मिमी ते २०० मिमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे पूरस्थिती आणि आपत्कालीन मदतीसाठी प्रशासनाने राज्यातील आठ जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) १३ तुकडय़ा, तर राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) दोन तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. कोकणात सर्वाधिक १० तुकडय़ा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
कोकणासह राज्यात १२ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे कोकणातील सर्व जिल्हे आणि सातारा, पुणे, कोल्हापुरात अतिवृष्टीची शक्यता आहे. यंदा जुलैच्या सुरुवातीपासून राज्यभरात पावसाने जोर धरला असून त्यामुळे १० जुलैपर्यंत सरासरी ३३६ मिमी म्हणजेच सरासरीच्या १०७ टक्के पाऊस पडला आहे.
विदर्भातील गोसेखुर्द आणि बेंबळा प्रकल्पाची दारे उघडण्यात आली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासूनू विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस कोसळत आहे. नद्यांना पूर आला आहे. विदर्भात पावसामुळे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात वर्धा जिल्ह्यातील सहा, गडचिरोलीतील चार, अमरावतीतील दोन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातून वाहणाऱ्या सिपना नदीच्या पुरात धारणी तालुक्यातील दिया येथील कृष्णा कासदेकर (३५) हा युवक वाहून गेला. बाबासाहेब दरेकर या गुराख्याचा शेतात असताना वीज पडून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात वीज पडून २५ बकऱ्या ठार झाल्या.
वर्धा जिल्ह्यातील मृतांची संख्या सहावर गेली आहे. पुलगाव, बरानदा मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरात प्रणय पुंडलिक जगताप (१४) आणि आदित्य संजय शिंदे (१५) ही मुले वाहून गेली. यापैकी प्रणयचा मृतदेह सापडला, तर आदित्यचा शोध सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला. ट्रकमधील तिघांचे मृतदेह सापडले आहेत. वीज मंडळाचा एक कर्मचारीही वाहून गेला. त्याचाही मृतदेह सापडला. वर्धा निम्न प्रकल्पाचे सात, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे १३, तर यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळेही छोटय़ा नद्यांना पूर आला आहे.
नद्यांची स्थिती
रायगडमधील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आतापर्यंत दरड आणि पूरप्रवण भागातील ३६४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. रत्नागिरीतील जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्गमध्ये सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. कोल्हापुरात पंचगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे.
परशूराम घाट दोन दिवस बंद
अतिवृष्टीचा इशारा आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट १२ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पाऊस अंदाज..
मुंबई, ठाण्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यांत मंगळवापर्यंत ६४ ते २०० मिमी पावसाचा अंदाज आहे. सातारा, पुणे, कोल्हापुरात अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवारी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांत अतिमुसळधार तर नागपूर, वर्धा, गोंदिया, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात बचाव पथके सज्ज
- आठ जिल्ह्यांत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एनडीआरएफ) १३, तर राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाच्या (एसडीआरएफ) दोन तुकडय़ा तैनात.
- मुंबईत ‘एनडीआरएफ’च्या तुकडय़ा तैनात, पालघर जिल्ह्यात एक, ठाणे आणि रायगडमध्ये प्रत्येकी दोन तुकडय़ा सज्ज.
- रत्नागिरीत दोन, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तुकडी सज्ज. कोल्हापुरात दोन, साताऱ्यात एक तुकडी तैनात.
- नांदेड आणि गडचिरोलीमध्ये ‘एसडीआरएफ’ची प्रत्येकी एक तुकडी सज्ज.
पाऊसभान..
राज्यात रविवारी दिवसभर ठिकठिकाणी पाऊस पडला. रायगडमधील कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आतापर्यंत दरड आणि पूरप्रवण भागातील ३६४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. रत्नागिरीतील जगबुडी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. अतिवृष्टीचा इशारा आणि त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन परशुराम घाट १२ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. कोल्हापुरात पंचगंगा नदी दुधडी भरून वाहत आहे.