अलिबाग – पावसाळ्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात २११ दरडप्रवण गावे आहेत. या गावातील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी ३०० प्रशिक्षित आपदा मित्र नेमण्यात आले असून, सर्व गावांमध्ये नोडल ऑफिसर नेमण्यात आले आहेत. प्रशासनातर्फे गावांमध्ये बैठका घेऊन माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो. त्यामुळे पूर आणि भुस्खलनाच्या घटना जिल्ह्यात सातत्याने घडतात. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. पावसाळ्यामध्ये संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने अक्शन प्लॅन तयार केला आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली आहे. आपत्ती निवारणासाठी अपेक्षित असणारे साहित्य तालुका आपत्ती निवारण यंत्रणांच्या सुपूर्द करण्यात आले आहे.

हेही वाचा – “मला विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदारीतून मुक्त करा”, अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले…

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर येतो. यामुळे महाड, रोहा, पेण, माणगाव, खालापूर, कर्जत, पनवेल आदी शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. जिल्हा प्रशासनाने ६ रबर बोट दिल्या आहेत. १ बोट महाड नगर पालिका तर १ बोट रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे. महाड तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात २० ठिकाणी अलर्ट सिस्टीम यंत्रणा उभारण्यात अली आहे. महाड शहराजवळून जाणाऱ्या नदीवर दोन ठिकाणी रिव्हर लेव्हल गेज बसविण्यात आले आहेत.

पोलीस विभागाची वायरलेस यंत्रणा, हॅम रेडिओ इत्यादींच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, संबंधित तहसीलदार कार्यालयांमध्ये संपर्क व्यवस्था अबाधित राखण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माथेरान, रायगड किल्ला, गणेश टेकडी महाड याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रिपीटर स्टेशन उभारण्यात येत असून महाड उपविभागामध्ये वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा उभारण्यात येत आहे. जिल्ह्यातील ८२ महसूल मंडळ केंद्रांवर स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यात आली आहेत. महाड तालुक्यात २६ पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आली आहेत. मोबाईल टॉवरला अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी जनरेटरची सुविधा पुरविण्यात येणार आहे. तातडीने संपर्क करता यावा यासाठी २१ सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यात आले आहेत.

रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात ६, मुरुड ६, पेण १०, पनवेल ३, उरण १, कर्जत ४, खालापूर ८, रोहा १६, सुधागड ३, माणगाव ७, श्रेवर्धन ७, म्हसळा ६, महाड ७५, पोलादपूरमध्ये ५९ गावे दरडप्रवण आहेत. या सर्व गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. या गावांना भेटी देऊन कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थान अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

हेही वाचा – “मोदींमुळे मुलींची उंची वाढली”, भाजपा नेत्याच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचा हल्लाबोल, म्हणाले, “सत्ता आल्यापासून…”

पूराचा धोका असलेली शहरे….

जिल्ह्यात सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, भोगावती या प्रमुख नद्या आहेत. तर महाड, रोहा, नागोठणे, आपटा, रसायनी, पेण ही शहरे नदी किनारी वसली आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास या शहरांना तसेच लगतच्या परिसराला पूर समस्येला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी निकाऱ्यांवरील गावांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरड प्रवण गावे

अलिबाग तालुक्यात ६, मुरुड ६, पेण १०, पनवेल ३, उरण १, कर्जत ४, खालापूर ८, रोहा १६, सुधागड ३, माणगाव ७, श्रेवर्धन ७, म्हसळा ६, महाड ७५, पोलादपूरमध्ये ५९ गावे दरडप्रवण आहेत, त्यामुळे या गावांतील डोंगरमाथ्यावर पडणाऱ्या पर्जन्यमानावर लक्ष्य ठेवणे, डोंगराला भेगा पडल्या नाहीत ना याची नियमित पहाणी करणे, गरज पडल्यात दरडप्रवण गावातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करणे यासारख्या सूचना देण्यात आल्या आहेत.