कराड : कराडलगतच्या खोडशी वळवणीच्या बंधाऱ्यातून कृष्णा कालव्याला चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाटबंधारे विभागाकडून प्रतिसेकंद २२० घनफूट (क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्याचा चार तालुक्यांतील ३४ गावे; १३,३६० हेक्टर शेतीक्षेत्राला लाभ होणार आहे.
कराडलगतच्या खोडशी वळवणीच्या बंधाऱ्यातून कृष्णा नदीचे पाणी कालव्यात सोडण्यात येत आहे. कृष्णा कालव्याचे हे पाणी सातारा जिल्ह्यातील कराड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील ३४ गावातून वाहत येरळा नदीला जाऊन मिळते. सुमारे ८६ किलोमीटर लांबीच्या कृष्णा कालव्यावर शेती, पशुधन तसेच लाखो लोकांचे जीवन अवलंबून आहे.
तब्बल ३४ गावे व सुमारे १३ हजार ३६० हेक्टर शेतीक्षेत्र या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. उष्म्याची तीव्रता वाढल्यामुळे सध्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता होती. पिके होरपळत असल्याने कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. ही न्याय्य मागणी गांभीर्याने घेऊन २५ दिवसांच्या कालावधीसाठी हे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे चार तालुक्यांतील शेतीक्षेत्राला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळणार असल्याने शेतकरी व लाभार्थी जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.