चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दररोज वाढत असून आज जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन व जिल्हा परिषद मधील एक कर्मचारी देखील पॉझिटिव्ह ठरले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५२३ लोकांना कोरोना आजाराची लागण झाली असून ३२२ बाधित बरे झाले आहेत. सध्या २०१ बाधितावर उपचार सुरू आहे. दरम्यान जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद परिसर सील केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल ४९५ असणारी रुग्णसंख्या आज सायंकाळपर्यंत ५२३ झाली आहे.एकाच दिवशी २८ बाधित जिल्हयातून पुढे आले आहेत.यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन लिपिकांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या संपर्कातील सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू होती. निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील ७० कर्मचाऱ्यांचे नमुने घेण्यात आले.

आज पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातून ३, चिंतल धाबा पोंभुर्णा या ठिकाणावरून २, पोंभुर्णा शहरातून एक, भद्रावती तालुक्यातून एकूण ४ नागरिक पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये कुचना येथील २, एकता नगर येथील एक, भद्रावती शहरातील आणखी एक बाधिताचा समावेश आहे. गडचांदूर लक्ष्मी टॉकीज जवळ आणखी दोन रुग्ण पुढे आले आहेत. तर चंद्रपूर शहरातील शक्तिनगर व दुर्गापूर परिसरातून प्रत्येकी एक बाधित पुढे आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्री उशिरा आणखी पुढे आलेल्या बाधितामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन, नागभीड येथील औरंगाबाद वरून आलेले एकूण पाच, व अँन्टीजेन चाचणीमध्ये पुढे आलेले एकूण सहा अशा दिवसभरातील 28 बाधितांचा समावेश आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी तीन बाधित जिल्हाधिकारी कार्यालयात पुढे आले असल्याची पुष्टी केली असून नागरिकांनी गरज नसताना सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे. सर्व कर्मचाऱ्यांची, त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत असून सर्वांची आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.