अश्‍लील चित्रफीत व छायाचित्र तयार करून ते समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देत एका वीटभट्टी चालकाला पंधरा लाख रुपयांची खंडणी मगितल्याचा प्रकार आष्टी (जि. बीड) येथे घडला. सदरील प्रकरणाचा भांडाफोड करत पोलिसांनी महिलेसह इतरांचा डाव उधळून लावत सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

बीड जिल्ह्यातील केज येथील वीटभट्टी चालकाचे बांधकामासाठी विटाची मागणी करणार्‍या एका महिलेशी त्यांचे भ्रमणध्वनीवरून बोलणे झाले. महिलेने त्यांना मांजरसुंबा येथे येण्यास सांगून नंतर त्याच्याच गाडीतून आधी पाटोदा व पुन्हा आष्टी येथे सोडण्यास सांगितले. आष्टी येथे गेल्यानंतर महिलेने वीटभट्टी चालकास चहासाठी घरात बोलावून अश्‍लिल छायाचित्रीकरण व छायाचित्र काढून ते समाज माध्यमातून प्रसारित करण्याची धमकी देत पंधरा लाख रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीपोटी तडजोड करून दहा लाख देण्याचे ठरले मात्र त्यासाठी केज येथे येण्याचे नियोजन झाले. वीटभट्टी चालकासोबत दुचाकीवर शेखर वेदपाठक हा देखील केजकडे निघाला. त्यांच्या पाठीमागे एक जीप सुद्धा होती.

शनिवारी केज येथे आल्यानंतर वीटभट्टी चालकाने आपल्या मित्राच्या सहाय्याने शेखर वेदपाठकला पकडले ते पाहून त्यांच्या पाठीमागे असलेली जीप तेथून निघून गेली. मांजरसुंबा (ता.बीड) येथे ही घटना घडल्याने वीटभट्टी चालकाने शनिवारी रात्री नेकनूर (ता. बीड) पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक व अन्य दोन महिला अशा सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.