Manoj Jarange Patil On Ajit Pawar : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांच्या कारणांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राज्य सरकारने २ सप्टेंबरमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत एक जीआर काढला. त्या जीआरनंतर ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. यावरूनच छगन भुजबळ व इतर ओबीसी नेते आणि मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे.
असं असतानाच आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे यांनी एक मोठा दावा केला आहे. ‘अजित पवारांविषयी मोठं षडयंत्र सुरू आहे’, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. ‘अलिबाबा म्हणजेच भुजबळ आणि परळी गँग अशा दोन तीन जणांकडून अजित पवारांना संपवण्याचा घाट घातल्याचा मोठा आरोप जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
“अजित पवार यांच्याबाबत देखील प्रचंड मोठं षडयंत्र सुरू आहे. परळीचं घराणं शक्यतो अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं. कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं. मात्र, पवारांमुळे मुंडेंचं अर्ध घराणं मोठं झालं. ते देखील छगन भुजबळांच्या या षडयंत्रामध्ये सहभागी झाले आहेत. कारण यांना ज्यावेळी कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळी त्यांनी मदतीचा हात दिला. आता अजित पवारांनी मोठं करून देखील या आलीबाबाने आणि आणखी दोन ते तीन जणांनी हा प्रयत्न आतून सुरू केला आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
“परळीचंही आतून असं म्हणणं आहे की आमची देखील तुमच्या सारखी दशा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता हे खरं आहे, याची लोकांमध्ये चर्चा आहे. एक दिवस देवेंद्र फडणवीस बॅग घेत होते, त्या देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली आता आमची अशी दशा आहे. मग ओबीसींचं एक स्ट्रक्चर उभा करायचं का? मग एवढा मोठा गेम प्लॅन, षडयंत्राचा तयार केला अशी लोकांमध्ये चर्चा आहे. मात्र, यांना माहिती नाही की छगन भुजबळ तुम्ही आतापर्यंत शरद पवार, शिवसेना प्रमुख, अजित पवार यांच्या डोक्यात झोपेत दगड घातला (म्हणजे पक्ष बदलले). पण आता ते देवेंद्र फडणवीस आहेत”, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
“ज्या शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला मोठं केलं, त्यांचं कुटुंब आणि पक्ष उद्धवस्त करून टाकलं, जो माणूस देवासमान होता, त्या माणसाला जेलमध्ये टाकलं. त्यानंतर आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत षडयंत्र रचायला लागलात”, असं म्हणत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
