सांगली : चित्रकला परिक्षेचे शुल्क भरूनही निकाल न मिळाल्याने पालकांनी तक्रार केल्यानंतर मिरज हायस्कूलच्या लेखनिकांने परीक्षा शुल्काचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी संबंधित लेखनिकाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी, चित्रकला परीक्षेचे मिरज हायस्कूल हे परीक्षा केंद्र होते. या केंद्रावरून ६९५ विद्यार्थ्यांनी ऑक्टोंबरमध्ये चित्रकला परीक्षा दिली होती. यापैकी ३३८ विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षा मंडळाने राखीव ठेवल्यानंतर परीक्षा शुल्काचा अपहार लेखनिकांने केला असल्याची बाब समोर आली.
या विद्यार्थ्यांच्या पालकांनी परीक्षा शुल्क मिरज हायस्कूलचे लेखनिक देवेश लक्ष्मण नलवडे यांच्याकडे जमा केली होती. मात्र, नलवडे यांनी सुमारे २५ हजार रूपये परीक्षा मंडळाकडे जमा केले नाहीत. यामुळे ३३८ विद्यार्थ्यांचे निकाल परीक्षा मंडळाने राखीव ठेवले.याबाबत महापालिका प्रशासनाकडे तक्रार करताच लेखनिक नलवडे यांना निलंबित करण्यात आले असून परीक्षा शुल्काचा अपहार केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.