सातारा: सातारा तालुक्यातील सासपडे येथील शालेय मुलीच्या खून प्रकरणातील आरोपी राहुल बबन यादव (सासपडे, ता. सातारा) यास पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला १८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान संशयित आरोपींला तत्काळ फाशीची शिक्षा दिली जावी, या मागणीसाठी साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले .

हे प्रकरण बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून या गुन्ह्याची तपासादरम्यान मिळालेल्या नव्या तथ्यांनुसार, संबंधित आरोपीवर खून, सोबतच बालकांचे लैंगिक शोषण अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सुरेखा क्षीरसागर यांनी काम पाहिले. त्यांनी आरोपीच्या गुन्ह्याचे गांभीर्य, पुरावे व तपासाची दिशा लक्षात घेऊन पोलिस कोठडीसाठी जोरदार युक्तिवाद केला. यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश – १ शेटे यांनी आरोपीला पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कड्डुकर, आणि पोलीस उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर करत आहेत. अल्पवयीन मुलीची राहुल यादव या नराधमाने निर्घृण हत्या केली या नराधमाचा खटला जलद गती न्यायालयात चालवून त्याला तात्काळ फाशीची शिक्षा दिली जावी या मागणीसाठी साताऱ्यात मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा व सासपडे ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपीला तात्काळ शिक्षा देण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर केले. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले.