परभणी: तालुक्यातील पारवा येथील शेत आखाड्यावर राहणाऱ्या कुटुंबावर दरोडा टाकून आखाड्यावरील महिलेवर अत्याचार करण्याची आणि दागिने लुटण्याची गंभीर घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींवर आता संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या फेब्रुवारी महिन्यात परभणी तालुक्यातील पारवा या गाव परिसरात असलेल्या शेत आखाड्यावर सालगडी म्हणून राहणाऱ्या कुटुंबाच्या घरावर दरोडा पडला होता. या घटनेत आरोपींनी शेत आखाड्यावरील महिलेवर अमानुष अत्याचार करून तिचे दागिने देखील लुटून नेले होते. या गंभीर स्वरूपाच्या घटनेबाबत जिल्हाभरात  संताप व्यक्त होत होता. जबरी चोरी आणि अमानुष अत्याचार प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलिसांनी या गुन्ह्याचा शोध लावत या घटनेतील आरोपींना शोधून काढत गुन्ह्याचा छडा लावला.

या प्रकरणी पोलीस तपास करत असताना अतिशय धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या माहितीनुसार  गुन्ह्यातील आरोपींवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या कृत्याला पायबंद बसण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याने परभणी पोलिसांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमप यांच्याकडे मोक्काअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता. पोलीस उप महानिरीक्षकांनी हा प्रस्ताव मंजूर केला असून या आरोपींविरूद्ध आता मोक्का लावण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली . महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख हे करीत आहेत.