कराड: संपूर्ण महाराष्ट्रासह देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून राहिलेल्या निकालात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे १६ आमदार पात्र असून, हा गटच खरी शिवसेना असल्याचा निर्णय जाहीर करताच ठाकरे गटाचे नेते, युवा आमदार आदित्य ठाकरे यांनी या निकालावर हल्लाबोल चढवला. हिटलरशाहीत घाणेरडे खोक्याचे राजकारण विधिसंमत झाल्याची जहरी टीका त्यांनी विधानसभा अध्यक्ष व राज्यकर्त्यांवर  केली.

पत्रकारांचा गराडा अन् गोंगाट

सातारा जिल्ह्यातील तळमावले येथे सभेसाठी आलेले आदित्य ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील सत्तासंघर्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा विधानसभा अध्यक्षांचा शिवसेनेच्या दावेदारीबरोबरच १६ आमदारांच्या अपात्रेच्या निकालामुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली. या गटाचे प्रमुख नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया म्हणजे मोठी बातमी असल्याने वृत्तवाहिन्यांच्या   प्रतिनिधींबरोबरच वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनीही आदित्य ठाकरेंभोवती गराडाचा घातला. एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले जाण्याबरोबरच सभास्थळावरील गर्दीच्या आवाजामुळे गोंगाट पसरला होता. अशा गोंधळातही आदित्य ठाकरे पत्रकारांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करीत बोलत होते.

हेही वाचा >>>पक्ष प्रमुखपद नाकारलं, घटनादुरुस्ती अवैध, आमदार मात्र पात्र; नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गटाचे वकील म्हणाले…

आमच्या पक्षात असताना नार्वेकर कोणाचे आदेश मानायचे?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानच भाजपाला अमान्य असल्याचा आरोप करुन, राहूल नार्वेकर जितकी वर्षे आमच्या पक्षात होते. तेंव्हा ते निवडणुकीचा एबी फॉर्म कोणाकडून घेत होते. पक्षप्रमुख म्हणून कोणाचे आदेश मानत होते असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. आमच्या पक्षाकडून घेतलेले एबी फॉर्म आणि त्यावेळचे पक्षप्रमुख ज्यांचे आदेश मानले हे तरी त्यांनी लक्षात ठेवायला हवे होते असा नार्वेकरांवर निशाणा आदित्य ठाकरे यांनी  साधला. आज स्पष्ट झाले देशात खरोखरच हिटलरशाही सुरु झाली असून, हे सारे आता जगाला कळले असल्याची टीका ठाकरे यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकात नक्की उलट तपासणी होईल

आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. शिंदे गटाला मूळ पक्ष ठरवून लोकशाहीची मोठी हत्याच झाली. आणि देशासाठी हे मोठे संकेत आहेत. घाणेरड्या राजकारणाने परिसीमा ओलांडली असलीतरी, लोकशाहीत जनताच सर्वश्रेष्ठ आहे. २०२४ च्या निवडणुकात आहेत. त्यात जनतेकडूनच राज्यकर्त्यांची नक्की उलट तपासणी होईल. आता सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. त्यातही जनतेकडून जास्तीच्या अपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरेंनी सांगितले.