राहाता : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने साईभक्तांना साई समाधी मंदिरात फुले, हार व प्रसाद नेण्यास बंदी करण्यात आली होती. साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीने बंदीचा हा निर्णय मागे घेतला आहे. भाविकांची लूट थांबवण्याकरिता साहित्य खरेदी केल्याची पावती प्रवेशद्वारावर दाखवल्यानंतर साईभक्तांना फुले, हार व प्रसाद नेण्यास मंदिरात परवानगी मिळणार आहे. या निर्णयाचे साईभक्त व ग्रामस्थांनी स्वागत केले.

करोना काळात साई मंदिरात फुले, हार व प्रसाद बंदी केल्यानंतर शिर्डीतील फुले विक्रेते व फुले उत्पादकांना आर्थिक फटका बसला होता. ही बंदी उठवण्याकरिता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांनी न्यायालयीन लढा उभारून बंदीचा निर्णय हटवल्याने फुले उत्पादक शेतकरी व फुले विक्रेत्यांना आधार मिळाला होता. शिर्डीतील काही दुकानदार फुले, हार व प्रसादाची जादा दराने विक्री करून भाविकांची लूट करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिर्डीत ग्रामस्थांनी या दुकानदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. तसेच भाविकांची लूट थांबवण्याकरिता डॉ. सुजय विखे यांनी बैठक घेऊन दुकानासमोर दरफलक लावण्याची सूचना केली होती. नगरपरिषदेलाही कारवाईचे आदेश दिले होते.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने काही महिन्यांतच पुन्हा साई मंदिरात फुले, हार व प्रसाद नेण्यास बंदी केली. त्यामुळे फुले उत्पादक शेतकरी या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या पुन्हा खचले, छोटे व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले होते. पुन्हा परवानगी द्यावी, याकरिता मंत्री विखे यांनी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला. अखेर संस्थानच्या तदर्थ समितीने फुले, हार व प्रसाद बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. तसेच भाविकांची लूट थांबवण्याकरिता साई मंदिरात भाविकांना साहित्य घेऊन जाण्यापूर्वी ज्या दुकानात साहित्य खरेदी केले, त्याची पावती मंदिर प्रवेशद्वारावर दाखवल्यानंतरच साई समाधी मंदिरात भाविकाला नेण्यास प्रवेश दिला जाईल, असा निर्णय घेतल्याने भाविक व ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दुकानदार भाविकांना साहित्य जास्त दर घेऊन विकत असल्याच्या तक्रारी साई संस्थानकडे येत होत्या. ही लूट थांबवण्याकरिता साई समाधी मंदिरात भाविकांनी पूजा साहित्य खरेदीचे बिल प्रवेशद्वाराजवळ दाखवल्यानंतरच साहित्य मंदिरात घेऊन जाता येईल. या निर्णयामुळे भाविकांची लूट थांबेल.गोरक्ष गाडीलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान.