बहुचर्चित समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला उद्घाटन करण्यात आले. हे उद्घाटन करण्याआधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतः नागपूर ते शिर्डी प्रवास करत या मार्गाची चाचणी घेतली होती. या संपूर्ण महामार्गाची बांधणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एमएसआरडीसीने केली आहे. असं असतांना हा महामार्ग वाहतुकीकरता सुरु झाल्यावर या मार्गावरील पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याची गंभीर गोष्ट समोर आली.

समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर ते शिर्डी हे अंतर ५२० किलोमीटर असले आणि काही तासात पार केले जात असले तरी या मार्गावरुन प्रवास करणे सध्या तरी त्रासदायक असल्याचं स्पष्ट झालं आहे. तब्बल १०० किमीच्या टप्प्यांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट नाही. एवढंच नाही तर एखाद्या १०० किलोमीटरच्या टप्प्यात इंधन भरण्याकरता पंप उपलब्ध नसल्याची तक्रार या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी मांडली. तसंच काही गंभीर अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिका पुरेशा अंतरावर मिळणार नसल्याचे दिसून आले. त्यातच वाहनांच्या काही अपघातांमुळे समृद्धी महामार्ग आणखी चर्चेत राहीला आहे.

हेही वाचा… समृध्दी महामार्गावर प्रवास करत आहात; तर ही काळजी घ्या, घरुनच….

तेव्हा एमएसआरडीसीने सावरासावर करत प्रसिद्धी पत्रक काढत सुविधा उपलब्ध असून पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम सुरु असल्याचा दावा केला आहे.समृद्धी महामार्गावर नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७ ठिकाणी तर शिर्डीहुन नागपूरच्या दिशेने जातांना ६ ठिकाणी अशा एकूण १३ ठिकाणी इंधन भरण्यासाठी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह, खानपान सेवा, टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

हेही वाचा… मुंबई: समृद्धीवर फूड प्लाझा आणि इतर सुविधांसाठी किमान वर्षभराची प्रतीक्षा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर २१ ठिकाणी सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने – QRV वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला नेण्यासाठी १३ क्रेनची सोय आहे. तसंच १५ रुग्ण वाहिका, १२१ सुरक्षा रक्षक या महामार्गावर विविध ठिकाणी तैनात आहेत. गेल्या ७ दिवसांत ५० हजाराहून अधिक वाहनांनी या मार्गावरुन प्रवास केला असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.