अहिल्यानगर : ओडिशा राज्यातून नगर जिल्ह्यात विक्रीसाठी आणलेला १९ लाख ९० हजार रुपये किंमतीच्या गांजासह मालमोटर, स्वीफ्ट व होंडासिटी मोटार, ११ मोबाईल, असा एकूण ८८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल कोतवाली पोलिसांनी जप्त केला. ओडिशातून गांजा घेऊन आलेल्यांसह नगरमधील खरेदीदार असे एकूण १० जण पोलिसांच्या सापळ्यात अडकले. त्यांना अटक करण्यात आली.
उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे सापळा रचून करण्यात आली. कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांनी ही माहिती दिली. शहरात यापूर्वी आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून आलेला गांजा पकडला गेलेला आहे. ओडिशा राज्यातून छत्रपती संभाजीनगर रस्त्याने नगर शहरात दाखल झालेला गांजा प्रथमच पकडला गेला.
संतोष प्रकाश दानवे (वय ४०, वाळवणे, पारनेर, अहिल्यानगर), गणेश बापू भोसले (वय २५, जवखेड खालसा, पाथर्डी, अहिल्यानगर), प्रशांत सुरेश मीरपगार (वय २५, कामत शिंगवे, पाथर्डी), प्रदीप बापू डहाणे (वय २९, पिंपळगाव लांडगा, ता. अहिल्यानगर), भगवान संजय डहाणे (वय २१, पिंपळगाव लांडगा), संदीप केशव बाग (वय २९, लेन्द्रीमाल, ओडिशा), दिलीप माखनौ भेसरो (वय ३०, चुडाधार, ओडिशा), अक्षय बापू डहाणे (वय २५, पिंपळगाव लांडगा), प्रमोद सुहास क्षेत्रे (वय २९, आलमगीर, भिंगार), ईश्वर संतोष गायकवाड (वय २६, पिंपळगाव लांडगा) या १० जणांना अटक करण्यात आली आहे.
काल, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर रस्त्याने केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ आलेल्या मालमोटारीवर केलेली कारवाई पहाटे ४ पर्यंत सुरू होती. मालमोटारीत ४ गोण्यांमध्ये एकएक किलोची गांजाची पाकिटे भरून ठेवण्यात आली होती. हा गांजा ओडिशा राज्यातील बहिरमपूर येथून आणला गेला होता.
केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ त्याचे जिल्ह्यात वितरण केले जाणार होते. त्यासाठी नगर शहर, भिंगार, पारनेर, पाथर्डी येथील खरेदीदार आलेले होते.
असा रचला सापळा
ओडिशातून गांजा घेऊन आलेली मालमोटार केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील टोलनाक्याजवळ अडवण्यात आली. चालक संतोष दानवे याने मालमोटारीत गांजा असल्याची कबुली दिली. ही मालमोटार बाजूला घेऊन पंचनाम्याचे काम सुरू असतानाच चालकाचा मोबाईल वाजला. संबंधित व्यक्तीने चालकाला तुम्हाला टोलनाक्याजवळ यायला किती वेळ आहे? आम्ही माल घ्यायला कधी येऊ, अशी विचारणा करू लागला.
उपविभागीय पोलीस अधिकारी भारती यांनी प्रसंगावधान राखत निरीक्षक दराडे यांना सूचना केल्या व चालकास समोरच्या व्यक्तीस बोलते ठेवण्यास सांगत, मालमोटारीचा क्रमांक देऊन गांजा घेण्यासाठी येण्यास कळवले. त्याचवेळी अतिरिक्त फौजफाटा मागवून घेण्यात आला व काही अंतरावर अंधाराचा फायदा घेऊन पोलीस दबा धरून बसले. स्विफ्ट कार व होंडासिटी मोटारीतून आलेल्या ७ खरेदीदारांना ताब्यात घेण्यात आले.