अहिल्यानगर : जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घालत अहिल्यानगर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहूरी, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर या ९ तालुक्यात धुवाँधार पावसामुळे राहाता, शेवगाव, जामखेड, पाथर्डी, कोपरगाव पुरस्थिती निर्माण झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते वाहतूक बंद पडली. चोवीस तासात राहातामध्ये तब्बल १५० मिमी. तर नेवासामध्ये ११९.९ मिमी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील ८४ मंडलामध्ये अतिवृष्टी झाली आहे.

जिल्ह्यात सर्वत्र पाणी-पाणीच झाले. हवेतही विलक्षण गारठा निर्माण झाला आहे. काही तालुक्यात रविवारी सकाळपर्यंत पाऊस कोसळतच होता. जिल्ह्यात १२ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत व अहिल्यानगर या पाच तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शनिवारी दुपारी ते रविवार सकाळ दरम्यान तब्बल ८१.८ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय (आकडेवारी मिमी.मध्ये) अहिल्यानगर- ९१.९, जामखेड- ९२.५, शेवगाव- ८९.३, पाथर्डी- ९३.९, नेवासा- ११९.९ , राहुरी- ८५.६, कोपरगाव- ११३.२, श्रीरामपूर- १०२.८, राहाता- १५०.८, पारनेर- ५८.२, श्रीगोंदा- ४९.४, कर्जत- ६०.६, संगमनेर- ५१.६ व अकोले- ४१.९.

अतिवृष्टी झालेली मंडले पुढील प्रमाणे- अहिल्यानगरः नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, नागापूर, जेऊर, चिंचोडी पाटील, वाळकी, चास, रुईछत्तीशी, नेप्ती. पारनेर- भाळवणी, सुपा, टाकळी ढोकेश्वर, पळशी, पळवे खुर्द. श्रीगोंदा- मांडवगण, कोळगाव, कर्जत- कोंभळी, मिरजगाव, माहिजळगाव, कुळधरण. जामखेड- जामखेड, अरणगाव, खर्डा, नान्नज, नायगाव, पटोदा, साकत. शेवगाव- शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव, दहिगावने, मुंगी. पाथर्डी- पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी, तिसगाव, खरवंडी, अकोला. नेवासा- नेवासा खुर्द, नेवासा बुर्दूक, सलाबतपूर, कुकाणा, चांदा, घोडेगाव, सोनई, वडाळा, प्रवरासंगम, देवगाव. राहुरी- राहुरी सात्रळ, ताहराबाद, देवळाली, टाकळीमिया, ब्राम्हणी, वांबोरी, बारागावनांदूर. संगमनेर- निमोन. कोपरगाव- कोपरगाव, रवंदे, सुरेगाव, दहिगाव, पोहेगाव, कोकमठाण. श्रीरामपूर- श्रीरामपूर, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीभान, कारेगाव. राहाता- राहाता, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा व अस्तगाव.

सर्वाधिक पाथर्डीत १९१ टक्के पाऊस

गेल्या काही दिवसांपासून सलग पावसाचा जोर सुरू आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा तालुका म्हणून ओळ असलेल्या अकोल्यात अद्यापि सरासरीपेक्षाही कमी, ९०.३ टक्केच पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक पाऊस पाथर्डीत १९१.९ टक्के पाऊसाची नोंद आहे. आतापर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे. अहिल्यानगर- १२९.९, पारनेर- १२५, श्रीगोंदा- २३६.८, कर्जत- १४८.६, जामखेड- १४३.१, शेवगाव- १६६, पाथर्डी- १९१.९, नेवासा- १५८.३, राहुरी- १००.३, संगमनेर- ९४.८, अकोले-९०.३, कोपरगाव- ९५.३, श्रीरामपूर- १०३.२, राहाता- ११२.६

४० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने नेप्ती नाका, कल्याण रस्ता भागातील वसाहतींमधून सीना नदीचे पाणी घुसले होते. या वसाहतींमधील ३५ ते ४० नागरिकांना बचाव पथकाने बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलवले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष मो. क्रमांक ९५६१००४६३७ व व्हाट्सअप क्रमांक ४१७५६७५२३२ यावर संपर्क करावा, असेही आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.