अहिल्यानगर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार यादीमधून प्रारूप मतदार यादी आज, बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना १४ ऑक्टोबरपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात लेखी सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल) शारदा जाधव यांनी केले.
जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी ३ हजार ६८९ मतदान केंद्र राहणार असून, ३० लाख ७ हजार ४०४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात निरीक्षणासाठी व पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती विहित वेळेत दाखल कराव्यात. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार केला जाणार नसल्याचेही कळविण्यात आले आहे.
तालुकानिहाय मतदान केंद्र संख्या व मतदारांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसात मतदान केंद्र संख्याः अकोले- २ लाख ११ हजार ८५२ (२७०), संगमनेर – ३ लाख ४५ हजार ५२८ (४२४), कोपरगाव – १ लाख ९० हजार ७८२ (२०७), श्रीरामपूर – १ लाख ५७ हजार ७३५ (१७५), राहाता – २ लाख ७ हजार ८५८ (२२०), राहुरी – २ लाख ६ हजार ८७३ (२३१), नेवासा – २ लाख ६७ हजार ५४८ (३२०), नगर – २ लाख ६४ हजार ६८१ (३१८), पारनेर – २ लाख ३८ हजार ३२६ (३३२), पाथर्डी – २ लाख १ हजार ९०५ (२५०), शेवगाव – १ लाख ७७ हजार ४८४(२१०), कर्जत – १ लाख ९३ हजार ८२० (२६२), जामखेड – १ लाख ६ हजार २२ (१३६), श्रीगोंदा – २ लाख ३६ हजार ९८० (३३४).
जिल्ह्यात ११ नगरपरिषदा व १ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, देवळाली प्रवरा, राहाता, शिर्डी, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, श्रीगोंदा या नगरपरिषदा व नेवासा नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. बुधवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्या-त्या नगरपरिषदेमध्ये प्रभागनिहाय प्रसिद्ध केली आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत हरकत व सूचना घेण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.