अहिल्यानगर: राज्य सरकारने यंदापासून एक रुपयात पीकविमा योजना बंद करून सुधारित पंतप्रधान पीकविमा योजना लागू केल्यानंतर या योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. योजनेला तीनदा मुदतवाढ देण्यात आली, तरीही पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. गेल्या वर्षी एक रुपयामुळे ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यंदा मात्र निम्म्याहून कमी म्हणजे २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

पीकविमा योजनेत यंदा शेतकऱ्यांनी अधिक सहभाग नोंदवला असता तर गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी विमा वरदान ठरला असता. परिणामी शेतकऱ्यांना अधिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कर्जदार व विना कर्जदार अशा एकूण २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी २ लाख ३७ हजार ७७५ हेक्टर क्षेत्राचा पीकविमा उतरविला आहे. त्यासाठी ४ लाख ४९ हजार ६४७ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापोटी शेतकऱ्यांनी त्यांच्या हिश्श्याचे २५ कोटी २८ लाख ५८ हजार ५४३ रुपये भरले आहेत.

राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा योजना बंद करून या वर्षीपासून सुधारित पीकविमा योजना लागू केली तसेच पीककर्जाची उचल करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक केली. त्यामुळे योजनेला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. यापूर्वीचा तीन-चार वर्षांतील पीकविमा योजनेबाबत शेतकऱ्यांचा अनुभव चांगला नाही. नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याने पीकविमा काढण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

सुधारित पंतप्रधान पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने शासनाने या योजनेला जुलैमध्ये आणि त्यानंतर १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली. पण, यानंतरही अल्प प्रतिसाद मिळाल्याने पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली. पण, यानंतरही शेतकऱ्यांच्या प्रतिसादात वाढ झाली नसल्याचेच चित्र आहे.

एक रुपयात पीकविमा योजना असताना सन २०२४-२५ मध्ये जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. तर ११ लाख ८० हजार अर्ज आले होते. त्या वर्षी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई पोटी तब्बल १ हजार २०० कोटी हून अधिक रक्कम मिळाली होती. मात्र ही योजना बंद झाल्यानंतर या योजनेचे स्वरूप बदले आणि शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली.

योजनेसाठी तालुकानिहाय आलेले शेतकऱ्यांचे अर्ज व त्याचा हिस्सा पुढीलप्रमाणे-अहिल्यानगरः २० हजार ९८७ शेतकरी व १ कोटी ११ लाख ९३ हजार ७५१ शेतकरी हिस्सा, अकोलेः ३३ हजार ६८९ शेतकरी व ८९ लाख ४४ हजार ४९९ रुपये, जामखेड: ५१ हजार ५५३ शेतकरी व ५ कोटी २९ लाख ४४ हजार ९८० रुपये, कर्जतः २३ हजार ९५४ शेतकरी व ७३लाख १७ हजार ६०७ रुपये, कोपरगावः २० हजार २१३ शेतकरी व १ कोटी ४५ लाख ५२ हजार ७४३ रुपये, नेवासाः ४५ हजार ३४४ शेतकरी व ४ कोटी ३६ लाख ४३ हजार ५५६ रुपये, पारनेरः ५० हजार ६९० शेतकरी व १ कोटी ८८ लाख ९८ हजार ३३० रुपये, पाथर्डीः ६० हजार ९०० शेतकरी व २ कोटी ६४ लाख ७२ हजार २२ रुपये, राहाताः २२ हजार ४८० शेतकरी व १ कोटी ७६ लाख ६९ हजार ४९ रुपये, राहुरीः २३ हजार ५१३ शेतकरी व १ कोटी ९४ लाख ७२ हजार ५७ रुपये, संगमनेरः २८ कोटी ७४४ शेतकरी व १ कोटी २४ लाख १० हजार ५३४ रुपये, शेवगावः ३९ हजार ३४७ शेतकरी व २ कोटी ९६ लाख ४० हजार ७९ रुपये, श्रीगोंदाः १३ हजार ५६५ शेतकरी व २७ लाख १२ हजार ६२७ रुपये, श्रीरामपूरः १४ हजार ६६८ शेतकरी व १ कोटी ३५ लाख ४९ हजार ९५१ रुपये.