अहिल्यानगर : जिल्ह्यातील बिबट्याचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी, बिबट्याच्या हालचाली टिपण्यासाठी वन विभाग जिल्ह्यातील वनक्षेत्रात शंभर ट्रॅप कॅमेरे बसवणार आहे. याशिवाय ड्रोन कॅमेराद्वारेही लक्ष ठेवणार आहे. जिल्हा बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. सन २०२४ च्या गणनेनुसार जिल्ह्यात सुमारे ४५० बिबट्यांचा अधिवास आढळल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात बिबट्याच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला. तर ५३ जण जखमी झाले. याशिवाय दुभती जनावरे मृत्युमुखी पडल्याची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यात राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, श्रीगोंदे, पारनेर येथील वनक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास आढळतो आहे. बिबट्या आता शहरी भागातही संचार करू लागले आहेत. उसाच्या क्षेत्रात त्याचा दिवस आढळून येतो. ऊस तोडणीच्या काळात बिबट्यांकडून हल्ले होण्याच्या घटनात वाढ झालेली असते.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात २ रेस्क्यू पथक तयार करण्यात आले आहे. त्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यात आले आहे. एका रेस्क्यू पथकामध्ये एक वनपाल, तीन वनरक्षक व एकचालक व त्यांच्या दिमतीला पिंजरा ठेवण्याची व्यवस्था असलेली जीप देण्यात आली आहे. ही दोन पथके राहुरी व संगमनेर येथे ठेवण्यात आली आहेत. नगरमध्ये तिसरे पथक ठेवले जाणार आहे.

ड्रोन कॅमेरेद्वारेही बिबट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. ड्रोन चालवण्याचे प्रशिक्षण वनरक्षकांना देण्यात आले आहे. बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी शंभर ट्रॅप कॅमेरे विविध ठिकाणच्या वनक्षेत्रात लावले जाणार आहेत. याशिवाय कोपरगाव व राहता वनक्षेत्रात संख्याबळ वाढवण्यात आले आहे. श्रीरामपूरमध्येही लवकरच संख्याबळ वाढवले जाईल, असे उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांनी सांगितले. जिल्ह्यात एकूण १ लाख ५७ हजार हेक्टरवर वन क्षेत्र अस्तित्वात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रात्रीही छायाचित्र टिपता येणार

ट्रॅप कॅमेरेद्वारे दिवसांसह रात्रीच्या वेळी छायाचित्र टिपता येणार आहे. त्यासाठी त्यामध्ये इन्फ्रारेड सेन्सर बसवण्यात आले आहेत. छायाचित्र टिपले जात असताना त्यावर वेळही नोंदवली जाईल तसेच बिबट्या कोणत्या दिशेला गेला आहे त्याचीही नोंद होईल. जिल्ह्याच्या विविध भागांत हे ट्रॅप कॅमेरे लावले जाणार आहेत.