अहिल्यानगर : श्रीगणेशाचे उद्या, बुधवारी सार्वजनिक गणेश मंडळासह घरोघरी आगमन होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी नगरकरांनी भक्तिभावाने सज्जता केली आहे. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली आहे. शहरात ठिकठिकाणी, विशेषत: कल्याण रस्त्यावर गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहेत. पूर्वसंध्येला गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी नगरकर सहकुटुंब बाहेर पडले होते. जलधारांनी त्यांच्यावर वर्षाव केला.
सार्वजनिक गणेश मंडळांची मंडपउभारणी पूर्ण झाली आहे. मंडपाचा परिसर, चौक कमानी उभारून, झालरी लावून, रोषणाईने झगमगाटून टाकण्यात आला आहे. गणरायाच्या स्वागताचे फलकही झळकवण्यात आले आहेत. शहरात गेल्या वर्षी ३७१ तरुण मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. यंदा सायंकाळी उशिरापर्यंत मंडपांना परवानगी देण्याचे काम महापालिकेत सुरू होते.
शहरातील कल्याण रस्त्यावर गणेश मूर्ती तयार करणारे अनेक कारखानदार आहेत. त्यांच्यासह विक्रेत्यांनी मूर्तीविक्रीचे स्टॉल लावले आहेत. यंदा शाडू मूर्तींना मागणी असल्याचे, तसेच मूर्तीच्या किमतीमध्ये १५ टक्के वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. आज मंगळवारी सकाळपासूनच शहरातील माळीवाडा, चितळे रस्ता, गंज बाजार, दिल्ली दरवाजा, प्रोफेसर चौक, पाइपलाइन रस्ता, भिस्तबाग केडगाव या ठिकाणी पूजेच्या साहित्यविक्रीच्या पथाऱ्या विक्रेत्यांनी टाकल्या होत्या. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतूककोंडी झाली होती. बाजारात सजावटीच्या मखराची किंमत ५०० रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत होती.
ग्रामदैवत पूजा
नगरचे ग्रामदैवत श्रीविशाल गणेश मंदिरात उद्या सकाळी ९.१५ वा. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते ‘श्रीं’ची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पहाटे महापूजा, प्राणप्रतिष्ठेवेळी ढोलपथकाची मानवंदना, तसेच दहाही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थानाचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी दिली.
ऐन उत्सवात खोदले रस्ते
ऐन गणेशोत्सवात शहरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदले गेले आहेत. मातीचे ढिगारे पडून आहेत. काही रस्ते बंद आहेत. त्यामुळे नगरकरांमध्ये काहीशी नाराजीची भावना आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने या संदर्भात महापालिकेला पत्र देऊन उत्सवापूर्वी रस्ते मोकळे करण्याची सूचना केली होती.
मंडपावर सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना
सार्वजनिक तरुण मंडळांनी मंडपावर सीसीटीव्ही लावण्याची सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केली आहे. उत्सवातील बंदोबस्तासाठी ३ हजारांवर पोलीस कर्मचारी, १५०० गृहरक्षक दलाचे जवान यांच्यासह स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत.
आरटीओचा उपक्रम
आरटीओच्या श्रीरामपूर विभागाच्या वतीने उत्सवकाळात रस्तासुरक्षा जनजागृतीसाठी ‘बाप्पाच्या गप्पा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. रस्ता सुरक्षा संदेश देणारे सेल्फी फलक गणेश मंडळांना दिले जाणार आहेत. नागरिक व भाविकांनी फलकासमोर छायाचित्र काढून ते कार्यालयास पाठवायचे आहे. तसेच आरतीपूर्वी अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना रस्ता सुरक्षेची शपथ देऊन मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय गणेशोत्सव व रस्तासुरक्षा या विषयावर चित्रकला स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. उत्कृष्ट देखावे व चित्रकला स्पर्धांना पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जोशी यांनी दिली.