अहिल्यानगर:सततच्या अतिवृष्टीने बेजार झालेल्या जिल्ह्याला पावसाने काल, रविवार दुपारपासून विश्रांती घेतल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे नद्या, ओढे, नाले यांची पूर परिस्थिती ओसरली असली तरी धरणांच्या जलाशयाचा फुगवटा व साठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाणी सोडल्याने, शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक गावे अद्याप पाण्यातच आहेत. परिणामी पंचनाम्यांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. आपत्ती निवारणाची बचाव पथकेही आता विसावली आहेत.

जिल्ह्यास गेल्या १२ सप्टेंबरपासून अतिवृष्टीने झोडपून काढण्यास सुरुवात केली. ती १९ सप्टेंबरपर्यंत लागोपाठ सुरूच होती. दोन दिवसांचा खंड पडल्यानंतर पुन्हा दिनांक दि. २२ पासून २८ च्या सकाळपर्यंत अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपले. धरणे, तलाव, बंधारे आधीच तुडुंब भरली होती. अतिवृष्टीने जलाशये प्रचंड प्रमाणावर फुगली आणि त्यांनी आजूबाजूची शेती, गावे व्यापून टाकली. तत्पूर्वी मे महिन्यातही जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला अतिवृष्टीने झोडपले होतेच.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी जोमाने सोयाबीन, मका, तूर, कांदा, भूईमूग आदी पिकांची पेरणी केली. काही ठिकाणी सोयाबीनच्या बियाण्यांत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याच्याही तक्रारी होत्या. नंतर पावसाने ताण दिल्याने दुबार पेरणीही करावी लागली होती. सप्टेंबरमध्ये मात्र अचानक अतिवृष्टीचे अस्मानी संकट कोसळले आणि त्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले.

अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नेवासे आदी भागांत पंधरा दिवसांतच सरासरीपेक्षा दीडपट ते दुप्पट पाऊस झाला. पुराच्या पाण्याने शेतीही खरवडून गेली. सततच्या अतिवृष्टीने पिके सडू लागली आहेत. शेतात केवळ पीकच नाही तर मातीही शिल्लक राहिलेली नाही. अनेक ठिकाणी तर शेतात केवळ आता दगडगोटेच दिसत आहेत. कपाशी पिकावर मर रोग वाढू लागला आहे. भुईमूग पाण्याखाली गेला आहे. पूर्ण खरीप हंगामच पाण्यात गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दिवाळी सण कसा साजरा करायचा, असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान केवळ शेती पिकांपुरतेच मर्यादित नाही. दुभती जनावरेही अनेक ठिकाणी वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जोडधंद्यालाही मोठा फटका बसलेला आहे.

बाधितांना मोफत धान्य योजनेचा बोजवारा

अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांना मदत म्हणून राज्य सरकारने १० किलो तांदूळ, १० किलो गहू व ५ लिटर रॉकेल मोफत देण्याचा आदेश काढला आहे. मात्र त्यासाठी सन २०१९ व २०२४ मधील निकषांचे, अटी व शर्तींचे पालन करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. या अटी व शर्ती क्लिष्ट असल्याने मोफत धान्य वाटप अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यासाठी बाधिताची शेती किमान पाण्याखाली असावी, घर पूर्ण पडलेले असावे यासह इतर नियम लागू आहेत तसेच अधिकारी पातळीवर करावयाची कार्यवाही अतिशय क्लिष्ट असल्याने जिल्हा पुरवठा विभागाने ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील स्वस्त धान्य दुकानदारांना आगाऊ देऊन शिधापत्रिकाधारकांना मदत करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून मिळाली.