अहिल्यानगर: मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्या आधारावर शेतकऱ्यांनी जोमाने पेरण्या केल्या. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ८६७ हेक्टरवर (९१ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाने ओढ दिली आहे. पाणलोटात चांगला पाऊस असला तरी लाभक्षेत्रात मात्र पिकांना पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. जुलै महिन्याच्या गेल्या २१ दिवसांत केवळ पाच दिवस, अल्प प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील वाढीच्या अवस्थेतील अनेक भागातील पिकांना ताण बसला आहे. परिणामी पिकांची वाढ खुंटण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात जुलैमध्ये सरासरी ६० मिमी पावसाची नोंद होते, मात्र आतापर्यंत ३३.८ मिमी. पाऊस झाला आहे. हा पाऊसही केवळ पाच दिवसांचा आहे. कृषी विभागाने खरिपाचे ७ लाख १६ हजार २०८ हेक्टर क्षेत्रावर नियोजन केले होते. आतापर्यंत ६ लाख ५३ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर (९१.३० टक्के) खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात मका व तुरीचे क्षेत्र वाढले आहे.
मकाचे ९५ हजार ७४० हेक्टरवर (१२२ टक्के) तर तुरीचे ६६ हजार १५ हेक्टर (१०२ टक्के) पेरणी झाली आहे. अकोल्यात भाताची ५० टक्केपेक्षा कमी क्षेत्रावर, १८ हजार ७४५ हेक्टर क्षेत्रावर, बाजरीची ५६ हजार ७१० हेक्टर, मूग ४७ हजार ७२९ हेक्टर, उडीद ६६ हजार १९६ हेक्टर, भुईमूग ४२२० हेक्टरवर पेरणी झाली आहे. सोयाबीन क्षेत्र १ लाख ७८ हजार ५०५ हेक्टरपैकी १ लाख ७१ हजार १८७ हेक्टरवर तर कापसाची १ लाख ५५ हजार ३२८ हेक्टर पैकी १ लाख ३४ हजार ९५२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
कापूस व मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कापूस व मका पिकावर सध्या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. कापसावर मावा व तुडतुडे या किडीचा तर मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळू लागला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणी करावी असेही आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जेथे शाश्वत सिंचन उपलब्ध आहे तिथे शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर करून सिंचन करावे. मूलस्थानी जलसंरक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब करून चांगल्या प्रकारे पीक वाढ मिळू शकते. सरी पद्धत अवलंब केल्यास एकआड एक सरी पद्धतीने पाणी दिल्यास चांगला परिणाम दिसून येईल. यासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. – सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी