अहिल्यानगर: जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या पावसाने धरणे पुरेशी भरली. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीच्या संकटाची शक्यता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज, बुधवारी नगरमध्ये व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी हवामान खात्याशी समन्वय करून नियोजन करावे. तसेच धरणांतील पाण्याच्या सिंचन व बिगर सिंचन आवर्तनाबाबत निर्णय घेतला जाईल, परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.
मंत्री विखे म्हणाले, सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने धरणे भरली. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट आहे. अशा स्थितीत भविष्यातील पिण्याच्या व शेती पाण्याच्या नियोजनासाठी हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भविष्यातील पावसाची स्थिती कशी राहील, हे जाणून घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास केल्या आहेत. त्यानुसार धरणातून सिंचन व बिगर सिंचन आवर्तन सोडण्याचे नियोजन केले जाईल.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे अजेंडाच नव्हता व हे महायुती सरकारचे यश आहे. परंतु, जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळे आरोप करून जनतेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. मात्र, अधिवेशनात सरकारने घेतलेले निर्णय पाहता महायुतीवरील जनतेचा विश्वास दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे, असा दावाही विखे यांनी केला.
शनिदेवाचा प्रक्षोभ व चमत्कार दिसेल
शनिशिंगणापूर येथील शनि देवस्थानसंदर्भात बनावट ॲप, नोकर भरती व अन्य तक्रारींबाबत बोलताना मंत्री विखे म्हणाले, शनिशिंगणापूरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सविस्तर निवेदन केले आहे. अनेक गंभीर आरोप त्यात आहेत. त्यामुळे शनि संस्थानचे विश्वस्त मंडळ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल. परंतु, जागृत देवस्थान असलेल्या शनि देवाच्या दानपेटीत ज्यांनी हात घातला, त्यांना शनि देवाच्या प्रक्षोभाला व चमत्काराला सामोरे जावे लागेल.
कृषिमंत्री दिलखुलास
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांवर बोलताना मंत्री विखे म्हणाले, आमदार रोहित पवार यांनी इतरांना सल्ले देण्यापेक्षा स्वतःचा पक्ष आधी सांभाळावा. माणिकराव यांनी स्वतः खुलासा केलेला आहे. ते स्वतः दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या मनात काहीही नसते, परंतु त्यांचे मन जरी साफ असले तरी ‘पब्लिक लाईफ’मध्ये त्यांना मी मर्यादित बोलण्याचे सांगितले आहे. कधी कधी त्यांचा उत्साह अनावर होतो, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार निर्णय करतील.
.