अहिल्यानगर : देशात आजपर्यंत एकाही मुस्लिम धर्मियाचे हिंदू धर्मात बळजबरीने धर्मांतर झाले नाही. परंतु भारतासह परदेशातील हिंदू धर्मांतरामुळे असुरक्षित आहेत. त्यामुळे धर्मांतर करणाऱ्या जिहादी वृत्ती व पाद्रींना विरोध करण्यासाठी केवळ मोर्चे काढून उपयोग नाही तर कोणत्याही हिंदूचे धर्मांतर होणार नाही, यासाठी प्रत्येकाने जागरूकपणे लक्ष ठेवावे.
राज्य व केंद्र सरकारने तातडीने धर्मांतर व लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांनी केली.
धर्मांतर विरोधी कायदा लागू करा तसेच सांगली जिल्ह्यात धर्मांतरासाठी विवाहितेचा छळ झाल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेच्या निषेधासाठी आज, रविवारी नगर शहरात ‘हिंदू जनाआक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला होता. बाजार समिती चौकात झालेल्या सभेत आमदार जगताप बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर, हिंदुत्ववादी कार्यकर्त्या वर्षा डहाळे (पुणे), आदिनाथ पालवे महाराज आदींसह हिंदुत्ववादी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सहभागी होते. मोर्चात सहभागी महिलांनी पेटत्या मशाली व मागणी फलक हाती घेतले होते.
आमदार जगताप म्हणाले, वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने हिंदू धर्मावर हल्ले होत आहेत. हे हल्ले थोपवण्यासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लव्ह जिहाद विरोधात व लोकसंख्या नियंत्रण कायदा तातडीने अंमलात आला पाहिजे.
सर्वांत जास्त धर्मांतर अहिल्यानगर जिल्ह्यात
आमदार पडळकर म्हणाले, राज्यात सर्वांत जास्त हिंदूंचे धर्मांतर हे अहिल्यानगर जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी जागृत राहून जिहादी व ख्रिश्चन पाद्रींना आपल्या भागातून हाकलून द्या. जिल्हाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर मशिदी व चर्चची शहानिशा करून त्यावर बुलडोझर फिरवावा. अनेकजण जातीने ख्रिश्चन पण शासकीय आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ते कागदोपत्री एससी, एसटी किंवा ओबीसी असल्याचे दाखवून फसवणूक करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करा. जे संविधान मानत नाहीत, भारतमाता की जय म्हणत नाहीत, राष्ट्रगीत म्हणत नाही अशांना भारताबाहेर काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आगामी अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा होण्यासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहे. ज्यांचे धर्मांतर झाले त्यांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याचा कायदा करा. – गोपीचंद पडळकर.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.