अहिल्यानगर : ज्येष्ठ नेते आमदार शिवाजी कर्डिले यांचे आकस्मिक निधन हा अहिल्यानगर जिल्ह्यावर आघात आहे. जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. आमदार कर्डिले ग्रामीण भागाची नाडी माहिती असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय असे नेतृत्व होते. विकासाचा सदैव ध्यास त्यांनी घेतला होता. या जोरावर त्यांनी सलगपणे मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनाने कर्डिले व जगताप कुटुंबीयांवर आघात झाला, त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

बुऱ्हाणनगर येथील श्रद्धांजली सभेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांच्यामागे आगामी काळात सर्वांनी आशीर्वाद द्यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, कर्डिले यांचे निधन अत्यंत धक्कादायक, भाजप परिवारासाठी वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक जीवनाच्या वाटचालीतील दिलखुलास मित्र काळाच्या पडद्याआड गेला. कालच, गुरुवारी आम्ही व कर्डिले एकत्रित पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांच्या दर्शनासाठी लोणी येथील निवासस्थानी एकत्र आलो होतो. आम्ही एकत्रित जेवणही केले.

अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्या. परंतु अचानक असे वृत्त येणे याचे मनस्वी दुःख झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात एक प्रभावी नेता म्हणून कर्डिले यांची ओळख होती. आमची मैत्री तब्बल २५ वर्षांची राहिली. कधी मतभेद झाले पण मनामध्ये कटुता होत नव्हती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर शेतकरी सभासदांच्या हिताचे निर्णय करून त्यांनी बँकेला लोकाभिमुख केले. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले, शिवाजी कर्डिले माझे राजकीय मार्गदर्शक होते. अनेक अडचणीच्या काळात त्यांनी मला आधार दिला. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले. सर्वसामान्यांचा ते आधारवड होते.

काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, कर्डिले यांचे निधन जिल्ह्यातील राजकीय क्षेत्राला धक्कादायक आहे. शेतकरी व दूध धंद्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा वापर केला. लोकांच्या प्रश्नांची जाणीव असणारे त्यांचे नेतृत्व होते. माजी खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले, त्यांचे अकस्मिक निधन हृदय पिळवटून टाकणारे आहे. ते माझे मार्गदर्शक होते. त्यांच्या अकाली जाण्याने जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. ते खरे जनतेचे हितचिंतक आमदार होते.