अहिल्यानगर : नगर महापालिका निवडणुकीत आघाडी करून लढायचं की स्वबळावर, याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. आघाडी होणार असेल तर जागा वाटपाचा विषय शेवटपर्यंत घोळवत ठेवू नका. हक्काच्या जागांवर शिवसैनिकांना लढण्याची संधी द्या. महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे, ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आज, शनिवारी सायंकाळी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी ठाकरे बोलत होते. खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित होते. ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हे पक्षप्रवेश घडले. यावेळी ठाकरे गटाचे पदाधिकारी विलास उबाळे, रावजी नांगरे, सुनील भोसले, आकाश आल्हाट, शंकर आव्हाड, विकास भिंगारदिवे, महावीर मुथा आदी उपस्थित होते.

बंद दाराआड चर्चा

पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी किरण काळे यांच्याशी महापालिका निवडणुकीच्या तयारीबाबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. आपण महापालिकेतील रस्त्यांचा घोटाळा बाहेर काढल्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला, असे स्पष्टीकरण काळे यांनी यावेळी दिले. शिंदे गटात गेलेले काही माजी नगरसेवक परतीच्या वाटेवर आहेत, त्यांनी आपल्याशी संपर्क साधल्याचा त्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असा दावाही काळे यांनी केला.

पुन्हा शिवबंधन बांधले

सत्ताधाऱ्यांनी आपल्याविरुद्ध अन्यायाने चुकीचा गुन्हा दाखल केला. आपल्याला बांधलेले शिवबंधन पोलीस कोठडीत असता पोलिसांनी तोडले. त्यामुळे आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून पुन्हा एकदा शिवबंधन बांधून घेतले, असा दावाही किरण काळे यांनी केला.

आघाडीमध्येच धक्के

महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असे तीन प्रमुख पक्ष आहेत. मात्र, काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्यामागे, ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी प्रयत्न केल्याने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्येच परस्परांना धक्का देण्याचे तंत्र अवलंबले जात असल्याची चर्चा शहरात सध्या सुरू झाली आहे.