अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व एक नगरपंचायत यांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर केवळ २७२ हरकती दाखल झालेल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्वतंत्र उपजिल्हाधिकारी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त्या केल्या आहेत. या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी हरकतींवर सुनावणी सुरू केली आहे. त्याचा अहवाल ९ सप्टेंबरला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी, शिर्डी, देवळाली प्रवरा, श्रीगोंदे, शेवगाव व जामखेड या ११ नगरपरिषदा व एक नगरपंचायत म्हणजे नेवासे अशा १३ पालिकांच्या निवडणुका गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्या आता होण्याची चिन्ह आहेत. या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना संबंधित पालिकांनी राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या सूचनेनुसार १८ ऑगस्टला जाहीर केली आहे. त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती मागवण्यात आल्या होत्या.
त्याची मुदत संपली आहे. मात्र, या हरकतींचे प्रमाण कमी आहे. संबंधित पालिका तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावरून हरकतदारांचे समुपदेशन करण्यात आल्याने तसेच मुख्याधिकाऱ्यांकडून पाठवण्यात आलेल्या प्रारूप अहवालावर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून छाननी करून दुरुस्त्या करण्यात आल्याने हरकती दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले.
शिर्डीमध्ये ११ प्रभाग असून, तेथे केवळ एकच हरकत दाखल झाली आहे तर देवळाली प्रवरामध्ये केवळ ३ हरकती आल्या आहेत. सर्वाधिक हरकती जामखेडमध्ये ९० दाखल झालेल्या आहेत. इतर नगर परिषदांमधील दाखल झालेल्या हरकतींची संख्या पुढीलप्रमाणे- पाथर्डी २, कोपरगाव १०, शेवगाव २७, संगमनेर ३३, श्रीगोंदे ६, राहाता ५, राहुरी १६, श्रीरामपूर ४५ व नेवासे नगरपंचायत ३३ अशा एकूण २७२ हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींची सुनावणी संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे. ती ८ सप्टेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर ९ सप्टेंबरला सुनावणी झाल्यानंतरचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करायचे आहेत. त्याचा अंतिम आराखडा ११ सप्टेंबरपर्यंत नगर विकास विभागाला सादर करायचा आहे. तर १२ ते १८ सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यानंतर दि. २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे.
सुनावणीसाठी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारी
दाखल झालेल्या हरकतींवर सुनावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेले उपजिल्हाधिकारी पुढीलप्रमाणे- सायली सोळंके (कोपरगाव), अरुण उंडे (संगमनेर), किरण सावंत पाटील (श्रीरामपूर), नितीन पाटील (जामखेड), सुभाष दळवी (शेवगाव), प्रसाद मते (पाथर्डी), माणिक आहेर (राहाता), अनुपसिंह यादव (राहुरी), गौरी सावंत (देवळाली प्रवरा), सुधीर पाटील (नेवासा), अतुल चोरमारे (शिर्डी) व श्रीकुमार चिंचकर (श्रीगोंदा). या सर्व सुनावण्या संबंधित तहसील, उपविभागीय कार्यालय किंवा संबंधित नगरपरिषदेच्या कार्यालयात घेतल्या जातील.